वर्धेला होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात नागपूरच्या बसोली ग्रुप, स्कूल ऑफ स्कॉलर्स, आणि विदर्भ साहित्य संघ यांच्यावतीने मनोहर म्हैसाळकर स्मृती वैदर्भिय काव्य नक्षत्रमाला हा कविता दृष्यीकरण बालचित्र प्रकल्प राबविण्यात येणार असून ४ फेब्रुवारी संमेलन स्थळी या प्रकल्पाचे उद्घाटन होईल. या प्रकल्पात ३० निवडक कविता निवडण्यात आल्या असून त्यावर बसोलीचे १५० बालचित्रकार ४ ते ५ बाल चित्रकारांचा एक गट करुन ३० वेगवेगळ्या कॅन्व्हासवर सामूहिकपणे या कवितांचे दृष्य स्वरुप रसिकासमोर रंग आणि रेषेच्या माध्यमातून मांडणार आहे.
हेही वाचा >>> वर्धा : लेझिमचा नाद अन् टाळमृदूंगांचा गजर; ग्रंथदिंडी, वृक्षारोपणाने साहित्य संमेलनास प्रारंभ
ही बालचित्रकार मंडळी विदर्भातील विविध शाळेतील असून बसोलीचे सदस्य आहेत. प्रत्येक गटाला नक्षत्र आणि तारे यांची नावे देण्यात आली आहे. ४ बाय ४ च्या मोठ्या कॅन्व्हासवर अँक्रलिक रंगाच्या माध्यमातून ही कविता चित्र साकारण्यात येणार आहे. कवी सुरेश भट, ग्रेस, ना. घ. देशपांडे, विठ्ठल वाघ, श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर, कवी अनिल, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाब. राम शेवाळकर यांच्यासह प्रफुल शिलेदार, संजय तिगावकर, आदींच्या कवितावर ही चित्र रेखाटणार आहे. मराठीवरील आक्रमणाच्या आजच्या इंग्रजी वातावरणात किमान एक मराठी कविता तरी त्यांनी पूर्णपणे समाजावून घेऊन ती चित्रित करताना ती रंगरेषांच्या माध्यमातून आनंदाने अनुभवावी असाही या चित्र प्रकल्पामागील उद्देश असल्याचे बसोलीचे प्रमुख चंद्रकात चन्ने यांनी सांगितले.