नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह’ या नियोजित कार्यक्रमासाठी तातडीची निविदा प्रक्रिया (शॉर्ट टेंडरिंग) राबवून १ कोटी ६२ लाखांचे कंत्राट खासगी कंपनीला दिले. या कंपनीच्या नावाने कंत्राट घेऊन सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या एका नातेवाईकाने उपकंत्राटदार म्हणून कोल्हापूरचा संपूर्ण कार्यक्रम स्वत: केला. ‘बार्टी’कडून जयंतीच्या नावावर थातूरमातूर कार्यक्रम घेऊन एका खासगी कंपनीला लाभ पोहचवल्याचा आरोप होत आहे. ‘बार्टी’ने छत्रपती शाहू महाराजांचा १५० वा जयंती सोहळा २६ जून ते २ जुलै दरम्यान कोल्हापूर येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ‘बार्टी’ने ऐंजल अॅडव्हरटाइजिंग प्रा. लि. या कंपनीला दोन प्रकारच्या कार्यक्रमांसाठी कंत्राटाचे आदेश दिले. या कंपनीमध्ये सचिव भांगे यांचे नातेवाईक भागीदार आहेत. त्यामुळे त्यांनी या कंपनीच्या नावाने कंत्राट घेऊन कोल्हापूर येथील कार्यक्रमाचे संपूर्ण काम केले होते. कार्यादेशानुसार त्यांना सामाजिक व्याख्यान, कलावंत, अभिवादनपर होर्डिंग, बॅनर, मंडप, व्यासपीठ, भोजन, निवास व इतर साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी १ कोटी १० लाख ६७ हजार ७६२ रुपयांचे कंत्राट देण्यात आले. तर दुसऱ्या आदेशामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सात दिवस प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी ५१ लाख ७६ हजार ७० रुपयांचे कंत्राट देण्यात आले. हे दोन्ही कंत्राट मिळून १ कोटी ६२ लाख ४३ हजार रुपयांचे आहेत. भांगे यांचा प्रतिसाद नाही यासंदर्भात विचारणा करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना मंगळवारी दिवसभर दूरध्वनी व संदेशाद्वारे अनेकदा संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याशिवाय त्यांच्या कार्यालयातील स्वीय सहायकांनाही अनेकदा संपर्क केला असता भांगे यांनी प्रतिसाद दिला नाही. तात्काळ निविदेवर आक्षेप ? ‘बार्टी’ने कंत्राट दिलेल्या आदेशानुसार कंपन्यांकडून फेब्रुवारी महिन्यात दरपत्रक मागवण्यात आले होते. याचाच अर्थ ‘बार्टी’ने २६ जून ते २ जुलै या दरम्यान कोल्हापूरच्या कार्यक्रमाचे नियोजन किमान जानेवारी २०२४ मध्ये केले असेल. त्यामुळे जून-जुलैमध्ये म्हणजे चार महिन्यांनंतर होणाऱ्या कार्यक्रमासाठी ‘तात्काळ’ निविदा प्रक्रिया का राबवण्यात आली? असा प्रश्न उपस्थित केला आहे. दोन दिवसांत गाशा गुंडाळला शाहू महाराजांच्या जयंतीचा उत्सव सात दिवस साजरा करण्याचा उद्देश असला तरी मुख्य व्यासपीठ दोन दिवसांतच काढण्यात आले. मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आलेच नाहीत. या संपूर्ण कार्यक्रमासाठी ‘शॉर्ट टेंडरिंग’ करण्यात आली. छत्रपती शाहू महाराज हे फार महान समाजसुधारक होते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात १५० व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्याचा मानस आहे. त्यांच्या कार्याची प्रसिद्धी देशात आणि विदेशात व्हावी म्हणून इंग्रजीमधून पुस्तके काढली जाणार आहेत. कोल्हापूरमधील कार्यक्रम दर्जेदार होता. शाहू महाराजांच्या कार्याचा संपूर्ण माहितीपट विविध फलकांच्या माध्यमांतून उलगडण्यात आला. निविदा प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने राबवून नियमानुसारच कंत्राट देण्यात आले आहे.- सुनील वारे, महासंचालक, बार्टी.