लोकसत्ता टीम
यवतमाळ : गेल्या ४८ तासांत यवतमाळ जिल्ह्यात बंजारा, आदीवासी व दलीत समाजातील पाच कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पोळा, गणेशोत्सव, गौरीपूजन आदी ग्रामीण सण आले की, शेतकरी आत्महत्यांनी समाजमन ढवळून निघते, त्याची पुनरावृत्ती यावर्षीही होत आहे.




जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात प्रवीण काळे (हिवरी), त्र्यंबक केराम (खडकी), मारोती चव्हाण (शिवणी), गजानन शिंगणे (अर्जुना) आणि तेवीचंद राठोड (बाणगाव) या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या नऊ महिन्यांत विदर्भात एक हजार ५८४ विक्रमी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून या आत्महत्यांना केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा)चे राष्ट्रीय प्रवक्ते व महाराष्ट्राच्या स्व. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे.
आणखी वाचा-“काँग्रेसचे नेते संभ्रम निर्माण करत आहेत”, बावनकुळे म्हणाले, “ओबीसींचे आरक्षण…”
शेतकरी आत्महत्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे आणणारे शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी म्हणाले, चालू वर्षात विदर्भात विविध संकटामुळे एक हजार ५८४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या २५ वर्षांतील ही विक्रमी संख्या असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. गेल्या वर्षीच्या कापूस, सोयाबीनच्या मंदीमुळे तसेच प्रचंड नापिकीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. लागवडीचा खर्च अतिशय वाढल्यामुळे व बँकांनी अपुरे पीककर्ज वाटप केल्यामुळे या आत्महत्या होत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. कमी मागणी असलेल्या कापूस या मुख्य नगदी पिकामुळे विदर्भाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. लागवडीचा खर्च वाढला, तर बँकांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अत्यंत कमी पीककर्जामुळे संकटात भर पडली आहे. शाश्वत पीक, अन्न डाळी आणि तेलबिया पिकांना प्रोत्साहन देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. जागतिक हवामानातील बदल हे सुद्धा सध्याच्या कृषी संकटाचे कारण आहेत, असे किशोर तिवारी म्हणाले.
आणखी वाचा-खासदार नवनीत राणांची मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार; ‘कडक नोटा’ प्रकरणी…
संसदेच्या विशेष सत्रात चर्चेची मागणी
विदर्भात दररोज एकापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या होत असताना, भविष्यात पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा भारताचा दावा फोल आहे, असा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. संसदेच्या विशेष सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सरकारने चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विदर्भाचा दौरा करावा, तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करून विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी तिवारी यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.