मासेमारांच्या जाळ्यात अडकले तब्बल १६ साप

तलावात मासे पकडण्यासाठी मासेमारांनी टाकलेले जाळे आता सापांसाठी कर्दनकाळ ठरत चालले आहेत.

मासेमारांच्या जाळ्यात अडकले तब्बल १६ साप
मासेमारांच्या जाळ्यात अडकले तब्बल १६ साप

नागपूर : तलावात मासे पकडण्यासाठी मासेमारांनी टाकलेले जाळे आता सापांसाठी कर्दनकाळ ठरत चालले आहेत. अंबाझरी तलावाच्या काठावर मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात एक-दोन नाही तर तब्बल १६ साप अडकले. सेमिनरी हिल्सवरील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्राच्या चमूसह सर्पमित्रांनी या जाळ्यातून त्यांची सुटका केली.

अंबाझरी तलावाच्या काठावर मासे पकडण्याच्या जाळ्यात खूप मोठ्या संख्येने साप अडकल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर यांनी ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्राला दिली. त्यांनी जाळ्यात अडकलेल्या सापांची चित्रफित राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांना पाठवली. त्यांनी तातडीने केंद्रातील सौरभ सुखदेवे तसेच सर्पमित्र मोनू सिंग यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. मोनू सिंग यांनी राेहित हुमाबादकरला अंबाझरी तलावावर पाठवले. पाठोपाठ सौरभ सुखदेवे, शिरीष नाखले, शुभम मेश्राम पोहोचले.

जाळीचा एकएक दोरा या सर्वांना कापावा लागला. दरम्यान, सापाने चावा देखील घेतला. मात्र, ते विषारी साप नसल्याने सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. तास-दोन तासाच्या परिश्रमानंतर या सर्व सापांना जाळीतून मुक्त करण्यात त्यांना यश आले. यातील दोन सापांचा जागीच मृत्यू झाला होता. तर उर्वरित १४ सापांची स्थिती चांगली असल्याने त्यांना तलावातच सोडून देण्यात आले. काही वर्षांपूर्वी सोनेगाव तलावात देखील याच पद्धतीने जाळ्यात एवढ्याच संख्येने साप अडकले होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ न्यूज ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 16 snakes caught fishermen nets pond fish ysh

Next Story
‘समृद्धी’वरील वाहनधारकांची बेपर्वाई मूक प्राण्यांच्या जीवावर, वाशीम जिल्ह्यात पाच गायींचा मृत्यू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी