नागपूर : मेडिकलमधील सहाय्यक अधिसेविकेपासून अधिपरिचारिकापर्यंतची एकूण मंजूर पदांपैकी १७ टक्के पदे रिक्त आहेत. येथे सध्या कार्यरत ९६३ परिचारिकांच रुग्णसेवेचा डोलारा सांभाळत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून पुढे आणले आहे.

मेडिकल रुग्णालयात सहाय्यक अधिसेविकेची ६ पदे मंजूर असून त्यातील ४ भरलेली तर दोन रिक्त आहेत. पाठ्यनिर्देशिकाची १७ पदे मंजूर असून त्यातील ४ रिक्त तर १७ भरलेली आहेत. सा. आ. परिसेविकाची (पीएचएन)ची ५ पदे मंजूर असून त्यातील पाचही भरलेली आहेत. बालरुग्ण परिसेविकेची सहा पदे मंजूर असून सगळीच भरलेली आहेत. मनोरुग्ण परिसेविकेची ६ पदे मंजूर असून ५ भरलेली तर एक रिक्त आहे. विभागीय परिसेविकेची २० पदे मंजूर असून त्यातील ११ भरलेली तर तब्बल ९ पदे रिक्त आहेत. परिसेविकेची ११८ पदे मंजूर असून त्यातील १२ रिक्त तर १०६ भरलेली आहेत. अधिपरिचारिकांची ९८४ पदे मंजूर असून त्यातील १७१ रिक्त आहेत. तर ८१३ पदे भरलेली आहेत. दरम्यान मेडिकलमध्ये प्रत्येक वर्षी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि विविध तपासणीच्या सोयी वाढत आहे. त्यानंतरही येथे सगळ्या संवर्गातील १ हजार १६२ पदांपैकी १९९ पदे रिक्त असल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचे परिचारिका संघटनांचे म्हणणे आहे.

ट्रामा केअर युनिटची स्थिती
मेडिकलच्या अखत्यारित असलेल्या ट्रामा केअर युनिटमध्ये अधिपरिचारिकांची ७९ पदे मंजूर असून त्यातील ११ रिक्त आहेत. ६७ पदे भरलेली आहेत तर परिसेविकांची ५ मंजूर पदांपैकी सगळीच भरलेली असल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.