संपामुळे प्रवाशांचे हाल सुरूच, आठ आगारातून एकही बस सुटली नाही

नागपूर : जिल्ह्य़ात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची तिव्रता तिसऱ्या दिवशी मंगळवारी आणखी वाढल्याने प्रवाशांचे हाल कायमच होते. येथील आठ आगारातून एकही बस सुटली नाही. कर्मचारी सेवेवर परतण्यास तयार नसल्याचे बघत आता महामंडळ कठोर भूमिका घेत असून  विभाग नियंत्रक कार्यालयाने मंगळवारी १८ आंदोलक कर्मचाऱ्यांना निलंबित केले.  

एसटीच्या नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयाने निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये गणेशपेठ आगारातील १, घाटरोड आगारातील १, इमामवाडा आगारातील ९, वर्धमाननगर आगारातील ७ अशा एकूण १८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांनी ३१ ऑक्टोबरला भाजपसह इतर राजकीय पक्षांनी केलेल्या  आंदोलनात सहभाग घेतला होता. बसची हवा सोडणे, प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसची अडवणूक करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे कृत्य केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. महामंडळाने  आंदोलन करणाऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह एसटी कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यावर ही निलंबनाची कारवाई झाल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे.

दरम्यान, मंगळवारीही जिल्ह्य़ातील आठही आगारातील  वाहतूक  ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल झाले. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी  प्रवाशांची संख्या कमी होती. खासगी बस कंपन्यांच्या कार्यालय परिसरात प्रवाशांनी मंगळवारी जास्तच गर्दी केली.  प्रवाशांकडून अवास्तव  शुल्क घेण्याचा क्रम सुरूच होता. त्यातच एसटीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन परत घेण्याची विनंती केली. परंतु कुणीही ऐकायला तयार नव्हते. 

तीन दिवसांत १.३१ कोटीचा फटका

जिल्ह्य़ात मंगळवारी ३७७ बसच्या १ हजार ५५० फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे ४८ लाख १९ हजार ८१५ रुपयांचे महामंडळाचे नुकसान झाले. रविवारी केवळ ३७ टक्के बसेस धावल्या. त्यामुळे ३५ लाखांचा फटका बसला होता.  सोमवारी  १ हजार ५५० फेऱ्या रद्द झाल्याने ४८ लाख १९ हजार ८१५ रुपयांचा महसूल बुडाला.  गेल्या तीन दिवसांत महामंडळाला १ कोटी ३१ लाखाचा फटका बसला आहे.