नागपूर : नागपूर विभागात करोनाच्या ओमायक्रॉन संवर्गातील बीए २.७५ या विषाणूच्या उपप्रकाराचे २० नवीन रुग्ण आढळले. हे नमुने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी)च्या जनुकीय चाचणी प्रयोगशाळेत तपासण्यात आले. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. राज्यात आजपर्यंत बीए २.७५ या उपप्रकाराचे ३० रुग्ण सापडले. त्यातील तब्बल २० रुग्ण नागपूर विभागातील आहे. नागपूरातील नीरीच्या प्रयोगशाळेत आढळलेले या उपप्रकाराचे रुग्णांचे नमुने हे १५ जून ते ५ जुलै या दरम्यान तपासलेले आहे. एकूण रुग्णांमध्ये ११ पुरूष आणि ९ स्त्रियांचा समावेश आहे. यापैकी १७ जणांचे लसीकरणही झाले आहे. काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे वा काहींमध्ये लक्षणेही नव्हती. एक रुग्ण १८ वर्षांखालील वयोगटातील, ९ रुग्ण १९ ते २५ वयोगटातील, ६ रुग्ण २६ ते ५० वयोगटाील, ४ पन्नासहून अधिक वयोगटातील आहे.