scorecardresearch

यवतमाळ : ज्येष्ठांनी ‘सेकंड इनिंग’मध्ये केली जिवाची मुंबई! आयुष्याच्या सायंकाळी मायानगरीची सफर

घाटंजी तालुक्यातील २० ज्येष्ठ नागरिकांनी (महिला, पुरुष) नुकताच हा अनुभव घेतला. शेतकरी, शेतमजूर, घरकाम करणारे कामगार आदींनी चक्क मुंबईची सफर तर केलीच, पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दिलखुलास संवादही साधला.

senior citizens Ghatanji taluka mumbai
ज्येष्ठांनी ‘सेकंड इनिंग’मध्ये केली जिवाची मुंबई!आयुष्याच्या सायंकाळी मायानगरीची सफर (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

यवतमाळ : अबाल, वृद्धांना वेड लावणारे आणि कुतूहल वाटणारे शहर म्हणजे मुंबई. ज्यांनी आपल्या हयातीत ही मुंबई वृत्तपत्रांत वाचून आणि टीव्ही, सिनेमांमधूनच बघितली त्यांना कोणीतरी आयुष्याची ‘सेकंड इनिंग’ सुरू झाल्यावर अनपेक्षितपणे मुंबईची सफर घडविली तर काय होईल? अर्थातच ते सर्वजण ‘जिवाची मुंबई’ करतील.

घाटंजी तालुक्यातील २० ज्येष्ठ नागरिकांनी (महिला, पुरुष) नुकताच हा अनुभव घेतला. शेतकरी, शेतमजूर, घरकाम करणारे कामगार आदींनी चक्क मुंबईची सफर तर केलीच, पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दिलखुलास संवादही साधला. आयुष्याच्या उत्तरार्धात कुटुंबापासून दूर असलेल्या, एकाकी पडलेल्या वृद्धांना आनंद देण्यासाठी घाटंजीतील सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी त्यांच्या ‘रसिकाश्रय’ या संस्थेमार्फत निवडक २० ज्येष्ठांसाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

हेही वाचा – नागपूर : प्रियकराने दगा दिल्याने विवाहितेची आत्महत्या

नातवांना ‘झुकझुक गाडी’ हे गीत शिकविणाऱ्या या ज्येष्ठांनी आयुष्यात प्रथमच रेल्वेचा प्रवास केला. समुद्र किनाऱ्यावर मनसोक्त भटकंती केली. चकचकाकीत हॉटेलमध्ये भोजन आणि मुक्कामाचा आनंद घेतला. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर, महालक्ष्मी, चैत्यभूमी, हाजी अली, गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, हुतात्म स्माकर, मंत्रालय, चर्चगेट, सीएसटीम आदी स्थळांना भेट दिल्या. बेस्टच्या ‘निलांबरी’मधून मुंबईची रपेट मारली. मुंबईतील अनेक सामाजिक कार्यकर्ते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट या उपक्रमात ज्येष्ठांना घालून देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांसोबत चहापान करून वृद्धांशी संवाद साधला. तेव्हा इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही निराधार पेन्शन वाढून देण्याची मागणी ज्येष्ठांनी केली. निर्मला राठोड, शोभा राव, वामन चौधरी, इंदूबाई पोटपिल्लेवर, विष्णू शिंदे आदींनी फडणवीस यांच्यासोबत संवाद साधला. अभिनेते सयाजी शिंदे यांनी मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून वृद्धांसोबत संवाद साधला.

हेही वाचा – भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांना ‘माय मराठी’ची ॲलर्जी; मराठी दिनाच्या दिवशीच ‘मराठी’ भाषेची लख्तरे वेशीवर

आयुष्याच्या सायंकाळी ज्येष्ठांना आनंद मिळावा म्हणून खास वयोवृद्धांसाठी ‘जिवाची मुंबई’ हा उपक्रम राबविला. मुंबईचे अस्मरणीय क्षण जगताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेले हास्य आणि आनंद फार मोलाचे वाटतो, असे सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी सांगितले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संतोष गर्जे, निलेश बुधावले, देवेंद्र गणवीर, वर्षा विद्या विलास, उमेश भोयर, आकाश बुर्रेवार आदींनी परिश्रम घेतले, तर ‘प्रयास’ अमरावती, महारष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ मुंबई, सत्य सामाजिक संस्था देवरी गोंदिया, मैत्र मांदीयाळी जालना या संस्थांनी सहयोग दिला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 12:59 IST