200 people poisoned by food during wedding ceremony in bandara | Loksatta

भंडारा : लग्न समारंभात अन्नातून २०० जणांना विषबाधा

ही घटना उघडकीस येताच गावातील जवळपास ७ विविध ठिकाणांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहे.

भंडारा : लग्न समारंभात अन्नातून २०० जणांना विषबाधा
भंडाऱ्यात लग्न समारंभात अन्नातून २०० जणांना विषबाधा

भंडारा गावात एका लग्न समारंभातील अन्नातून सुमारे २०० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुज. येथे उघडकीस आला आहे. गुरुवारी ८ रुग्ण तर शुक्रवारी सुमारे ६० जणांवर आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. यातील सर्वच रुग्ण किरकोळ बाधित होते. तर तीन रुग्णांना सलाईन लावण्यात आली. दोन दिवसांत आलेल्या सर्वच विषबाधित रुग्णांनी प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी विवेक बन्सोड यांनी दिली.

हेही वाचा- लोकसत्ता लोकांकिका’: तरुणाईच्या जल्लोषात स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात

सरांडी येथील मदन नामदेवराव ठाकरे यांचा विवाह २९ नोव्हेंबर रोजी किन्ही येथे पार पडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवार ३० नोव्हेंबर रोजी सरांडी येथे स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वऱ्हाडसह नातलग व गावकऱ्यांनी रात्री लग्नात जेवण केले. मात्र, दुसऱ्या दिवशी काहींना त्रास व्हायला लागला. तिसऱ्या दिवशी अनेकांना पोटदुखी, उलटी, हगवणीचा त्रास सुरू झाला. सगळ्यांनी सरांडी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. खासगी रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले आहे. यावेळी रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. तसेच बाधित रुग्ण शोधण्यास मोहीम राबविल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा- नागपूर: आता श्रीमंत मुधोजी राजे भोसलेही मैदानात, लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी

ही घटना उघडकीस येताच गावातील जवळपास ७ विविध ठिकाणांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहे. अन्न व तेलाचे नमुने सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात परीक्षणासाठी पाठवण्यात येणार आहेत. आशा वर्कर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून गावात सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती सरांडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक बनसोड यांनी दिली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 22:06 IST
Next Story
लोकसत्ता लोकांकिका’: तरुणाईच्या जल्लोषात स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात