लोकसत्ता टीम

अकोला : पोलीस शिपाईच्या १९५ पदांसाठी २१ हजार ८५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. १९ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. १७ दिवस चालणारी भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांनी दिली.

अकोला पोलीस दलातील १९५ पोलीस शिपाई पदासाठी एकूण २१ हजार ८५३ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यामध्ये १६ हजार १६१ पुरुष, तर पाच हजार ६९१ महिला उमेदवार तसेच एक तृतीयपंथी उमेदवाराचा देखील अर्ज प्राप्त झाला आहे. उमेदवारांना १९ जूनपासून शारीरिक चाचणी तसेच कागदपत्रे पडताळणीसाठी पोलीस मुख्यालयात सकाळी ५ वाजतापासून बोलावण्यात आले आहे. सुरुवातीचे दोन दिवस प्रत्येकी ८०० सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना हजर राहण्यास सांगण्यात आले. २१ व २२ जूनला एक हजार उमेदवार, २४ जून ते १ जुलैपर्यंत प्रत्येक दिवशी दीड हजार उमेदवारांची चाचणी घेण्यात येईल. २ जुलै रोजी एक हजार ०६२ सर्वसाधारण पुरुष उमेदवार व त्यानंतर भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, अनाथ, तृतीयपंथी, होमगार्ड, पोलीस पाल्य, खेळाडू, प्रकल्पग्रस्त आदी सर्व पुरुष उमेदवारांची ३ जुलैला चाचणी होईल.

आणखी वाचा-“नाना पटोलेंनी स्वतःला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये”, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची टीका; म्हणाले, “अतिशय संतापजनक…”

४ ते ५ जुलैला दीड हजार महिला उमेदवार, ६ जुलै रोजी उर्वरित महिला आरक्षणातील एक हजार ०५४ महिला उमेदवार, महिला भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, अनाथ, होमगार्ड, पोलीस पाल्य, खेळाडू, प्रकल्पग्रस्त आदी एकूण एक हजार १५६ महिला, ८ जुलै रोजी एक हजार ५३५ सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारांना मैदानी चाचणी व कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भरती प्रक्रिया एकूण १७ दिवस चालेल, असे बच्चन सिंह यांनी सांगितले. उमेदवारांची १००, ८०० व १६०० मीटर धावण्याचे चाचणी, उमेदवारांचे उंची व छाती मोजण्यासाठी तांत्रिक उपकरणांचा वापर करण्यात येणार आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. या प्रक्रियेत ३० पोलीस अधिकारी व २३२ पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त राहील. भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला किंवा भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा-अकोला : गरिबांच्या साड्यांमध्ये देखील दलाली, नाना पटोले यांची सत्ताधाऱ्यांवर टीका; अपशब्दांचा वापर

…तर चार दिवसांचे अंतर

अनेक उमेदवारांनी दोन किंवा त्यापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत. भरतीसाठी दोन ठिकाणी एकाच दिवशी किंवा लागोपाठ मैदानी चाचणी व कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवाराला तारीख देण्यात आलेली असल्यास अशा उमेदवारांनी एका ठिकाणची पडताळणी करून दुसऱ्या जिल्ह्यासाठी किमान चार दिवसांचे अंतराने पोलीस शिपाई raunak.saraf@mahait.org यावर ईमेल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.