नागपूर : जन्मापासून ऐकू न येणाऱ्या २२ महिन्यांच्या चिमुकलीवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत पहिली मोफत कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली आहे. दोन वर्षांखालील बालकावर या योजनेतून करण्यात आलेली ही संस्थेतील पहिलीच शस्त्रक्रिया असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील श्रवणदोष असलेल्या बालकांसाठी उपचाराचा नवा मार्ग खुला झाला आहे. यापूर्वी येथे इतर योजनेतून कॉक्लियर इम्प्लांट झाले आहे, हे विशेष.
नेमके प्रकरण काय आहे?
नागपूरातील २२ महिन्यांच्या बालिकेला जन्मजात दोन्ही कानांचा गंभीर श्रवणदोष असल्याचे निदान झाले होते. ओटोअकॉस्टिक इमिशन्स (ओएई) आणि ब्रेनस्टेम इव्होक्ड रिस्पॉन्स ऑडिओमेट्री (बेरा) या तपासण्यांमधून हा दोष स्पष्ट झाला. त्यानंतर आरबीएसके योजनेअंतर्गत आवश्यक तपासण्या पूर्ण करून बालिकेची कॉक्लियर इम्प्लांटसाठी नोंदणी करण्यात आली.
कॉक्लियर इम्प्लांट म्हणजे काय?
कॉक्लियर इम्प्लांट ही अशी शस्त्रक्रिया आहे, ज्यामध्ये गंभीर श्रवणदोष असलेल्या व्यक्तीच्या कानात विशेष उपकरण बसविले जाते. यामुळे ध्वनीचे संकेत थेट श्रवण मज्जातंतूपर्यंत पोहोचतात आणि ऐकण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होते.
शस्त्रक्रिया कशी पार पडली?
ही शस्त्रक्रिया आयजीजीएमसीच्या कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांच्या नेतृत्वाखाली सहयोगी प्राध्यापक डॉ. रितेश शेळकर आणि निवासी डॉक्टरांच्या पथकाने केली. भूलतज्ज्ञ डॉ. व्ही. शेळगावकर, डॉ. प्रियल शेळकर आणि त्यांच्या पथकाने सहकार्य केले. श्रवणतज्ज्ञ सुश्री मृगा वैद्य यांनी तांत्रिक मदत केली, तर शस्त्रक्रियेनंतरचे श्रवण व भाषा पुनर्वसन नागपूर ऑडिओलॉजी सेंटरच्या सुश्री इशिता मांडविया करीत आहेत.
आरबीएसके योजनेत काय सुविधा मिळतात?
या योजनेअंतर्गत कॉक्लियर इम्प्लांटचे उपकरण, शस्त्रक्रिया आणि त्यानंतरची आवश्यक सेवा कुटुंबावर कोणताही आर्थिक भार न टाकता उपलब्ध करून दिली जाते. तसेच पालकांना अत्यल्प शुल्कात श्रवण व भाषा विकासासाठी थेरपीची सुविधाही दिली जाते.
लवकर निदान का महत्त्वाचे आहे?
डॉ. जीवन वेदी यांच्या मते, जन्मजात श्रवणदोषाचे लवकर निदान आणि वेळेत कॉक्लियर इम्प्लांट झाल्यास बालकाचा भाषा विकास, बौद्धिक वाढ, शिक्षण आणि सामाजिक आयुष्य अधिक चांगले घडू शकते. त्यामुळे नवजात बालकांची प्राथमिक श्रवण तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे.
आयजीजीएमसीचा यापूर्वीचा अनुभव काय?
आयजीजीएमसी-मेयो रुग्णालयात आतापर्यंत सुमारे १२५ कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. यापूर्वी अनेक रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि एडीआयपी योजनेचा लाभ मिळाला होता. आता आरबीएसके योजनेचाही त्यात समावेश झाल्याने अधिक पात्र बालकांना मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत.
पुढील नियोजन काय आहे?
रुग्णालय प्रशासनाने आरबीएसके अंतर्गत कॉक्लियर इम्प्लांट सेवा अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे. नवजात आणि अर्भकांमध्ये ओएई आधारित श्रवण तपासणीला अधिक गती देऊन श्रवणदोषाचे वेळेत निदान आणि उपचार करण्यावर भर दिला जाणार आहे.
कोणाचे सहकार्य लाभले?
या उपक्रमासाठी सिव्हिल सर्जन डॉ. निवृत्ती राठोड, आरबीएसके पथक आणि महाराष्ट्र शासनाचे सहकार्य लाभले. तसेच आयजीजीएमसीचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, मेयो रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन शेंडे आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे संस्थेने आभार मानले.
