गडचिरोली : महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड सीमेवरील घनदाट जंगलात करेगुट्टा टेकडीवर गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या नक्षलविरोधी अभियानात २२ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही दिवसांपूर्वी याच परिसरात ३ महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले होते. अभियान अजूनही सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो.

कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा नेतृत्व करीत असलेल्या सर्वात आक्रमक बटालियन क्रमांक १ चे जवळपास ७०० हून अधिक नक्षलवादी छत्तीसगड-तेलंगणा सिमवेरील करेगुट्टा टेकडीवर एकत्र आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. यावरून केंद्र आणि राज्य सुरक्षा दलातील तब्बल १० हजारहून अधिक जवानांनी या परिसरात नक्षलविरोधी मोहीम उघडली. याला ‘ऑपरेशन संकल्प’ असे नाव देण्यात आले आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून जवानांनी या टेकडीला घेरले आहे. दरम्यान, ७ मे रोजी झालेल्या चकमकीत २२ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या मोहिमेदरम्यान ५० हून अधिक जवानांना उष्माघाताचा सामना करावा लागला आहे. मोहिमेवरील जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून साहित्य पुरवण्यात येत आहे.

नक्षलवाद्यांनी पत्रक काढून ही मोहीम थांबवण्याची विनंती केली होती. मात्र, या टेकडीवर पूर्ण नियंत्रण मिळवल्याशिवाय मोहीम थांबविण्यात येणार नाही, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आणखी मोठी चकमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उशिरापर्यंत मृत नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नव्हती. या ठिकाणी नक्षलवाद्यांचे काही मोठे नेते असल्याचा पोलिसांना संशय आहे.

टेकडीवरील गुहेवर ताबा, ड्रोनचा वापर मोहिमेदरम्यान जवानांनी टेकडीवर असलेल्या एका गुहेवर ताबा मिळविला होता. येथून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, मोठ्या सुरक्षा घेऱ्यात असलेला नक्षल कमांडर हिडमा या ठिकाणावरून पसार झाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे ही मोहीम आणखी किती दिवस चालणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ७ मे रोजी झालेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा जवानांनी ‘ड्रोन’चा वापर करून नक्षलवाद्यांची कोंडी केली. या माध्यमातून टिपलेल्या चित्रफितीत नक्षलवादी सैरभैर पाळताना दिसत आहेत.