वर्धा : वाघाची सुरक्षा देशातील वन्यजीवात सर्वोच्च ठरविण्यात आली आहे. तसे कठोर कायदे पण करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर वाघाचा मृत्यू दिसून आल्यास ती बाब प्रथमदर्शनी शिकारच समजावी आणि तपास करावा, असे स्पष्ट निर्देश आहेत. आताची एक घटना तर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण म्हणजेच NTCA ची झोप उडविणारी ठरली आहे. त्याची दखल म्हणुन ३१ ऑगस्ट रोजी या संस्थेने देशभरातील व्याघ्र प्रकल्प संचालकांना हाय अलर्टचा इशाराच दिला आहे.

२ वर्ष आणि २२ वाघ बेपत्ता

ही घटना आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध ‘ नागार्जुनसागर – श्रीशैलम या या व्याघ्र प्रकल्पाची आहे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार गत २ वर्षात येथून २२ वाघ गायब झाले आहेत. हे एक गूढ ठरले असून त्याची दखल NTCA ने घेतल्याचे सांगितल्या जाते. चौकशीचे आदेश झाले असून ही बाब आंतरराष्ट्रीय तस्करी असल्याचा अंदाज व्यक्त होतो. त्या अनुषंगाने देशातील व्याघ्र प्रकल्पस सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. गत काही महिन्यात या अभयारण्यातून वाघांची संख्या झपाट्याने घटल्याचा वन्यजीव अहवाल आला होता. त्यामुळे शिकार व तस्करीचा संशय व्यक्त झाला. NTCA चे वरिष्ठ आता घटनास्थळी जाऊन सखोल तपास करणार असल्याचे वृत्त आहे.

तस्करी आणि अतिदक्षतेचा ईशारा

या घटनेची नोंद घेत NTCA चे पोलीस महानिरीक्षक डॉ. संजयन कुमार यांनी सर्व राज्यांच्या मुख्य वनजीव रक्षकांना ( Chief Wild Life Wardens ) यांनाकाही निर्देश दिलेत. म्यानमार, कंबोडिया, चीन या सारख्या दक्षिण पूर्व आशियाई देशात वाघांचे अवयव, कातडी, हाडे यांस प्रचंड मागणी आहे. परिणामी भारतीय वाघांची शिकार करायची व अवयव आदींची आंतरराष्ट्रीय सीमेवरून बेकायदेशीर शिकार करायची, असा प्राधिकरणास संशय आहे. जगातील एकूण रानटी वाघांपैकी ७० टक्क्याहून अधिक वाघ भारतात आहेत. त्याचे संरक्षण आता अधिक ऐरणीवर आले आहे.

मुख्य वन संरक्षक म्हणतात

महाराष्ट्राचे मुख्य वन संरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी २२ वाघ बेपत्ता झाल्याच्या घटनेवर भाष्य नाकारले. नो कॉमेंट्स, असे ते स्पष्ट करतात. पण NTCA ने खबरदारी घेण्याचे पत्र पाठविल्याचे ते मान्य करतात. या पत्रात व्याघ्र प्रकल्प संचालकांना दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही उपाय पण सांगण्यात आले. सर्व व्याघ्र प्रकल्पच्या संवेदनशील भागात गस्त वाढवावी. तस्करीच्या संशयित मार्गावर २४ तास कडक पहारा ठेवावा. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत आरोपी व संशयित यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करावे. जंगलास लागून असणाऱ्या
सीमेवरील तपासणी नाके अधिक मजबूत करा. आंतरराज्यीय तस्करांचे नेटवर्क उध्वस्त करा.

चौकशी आणि खबरदारी

नागार्जुनसागर-श्रीशैलम हा भारतातील सर्वात मोठ्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक मानला जातो. तिथे अशी घटना घडावी, या बद्दल पर्यवरण चिंता व्यक्त करीत आहे. चौकशीत पुढे सर्व स्पष्ट होईलच. पण आता कठोर तपासणी सुचविण्यात आली आहे. जंगलास लागून असलेली गावे, आंतरजिल्हा सीमा, पाणवठे, वीज वाहिन्या मार्ग, जाळे लावून शिकार होण्याची शक्यता, अशी ठिकाणी सुरक्षा आढावा घ्यावा व मॅपिंग करावे. संवेदनशील भागात GPS यंत्रणेचा वापर करून रात्रंदिवस व अचानक गस्त घालण्याची सूचना झाली आहे.

व्याघ्र कक्ष व आढावा

शिकारीस आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय व्याघ्र कक्षाच्या बैठकी दरमहा व विभागस्तरीय दर तीन महिन्यांनी घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. बैठकीत संशयित तस्कर, वाहतूक मार्ग व गुन्ह्यांचा आढावा घेतल्या जाईल. सीमावर्ती राज्यांशी गुप्तचर माहितीची देवाणघेवाण तात्काळ केल्या जाईल. संयुक्त तपासणी व गस्त मोहिमा राबविल्या जातील.

प्रत्येक मृत्यू शिकारच

आता कोणत्याही वाघाचा मृत्यू हा संशयास्पद मानून तपास होणार. तो प्रथमदर्शनी शिकारीचा प्रकार समजल्या जाणार. शव विच्छेदन व अन्य अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण निश्चित होणार. २४ तासात प्राथमिक अहवाल मुख्य वन्यजीव रक्षक, NTCA आणि वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोस सादर करावा लागणार. वन विभागाने स्पष्ट केले की शिकारविरोधी कॅम्प पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील. गुप्तहेरांचे जाळे अधिक मजबूत केल्या जाणार. तपासात सायबर गुन्हे शाखा, स्नीफर डॉग आणि फॉरेन्सिक तज्ज्ञची मदत घेतल्या जाईल. या कामात कसूर, निष्काळजीपणा किंवा माहिती लपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई केल्या जाईल, अशी तंबी देण्यात आली आहे.