मिहानच्या प्रारंभापासून २३ हजार लोकांना रोजगार

गेल्या पाच वर्षांत  कार्यान्वित झालेल्या उद्योगांमधून ३ हजार ४९५ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

राजेश्वर ठाकरे

नागपूर आणि विदर्भातील युवकांना पुण्या-मुंबईकडे रोजगारासाठी जावे लागू नये, यासाठी मिहान-सेझ प्रकल्पाची मुहूर्तमेढ २००२ मध्ये  नागपुरात रोवली गेली. तेव्हापासून आतापर्यंत एकूण  १० हजार ९१५ प्रत्यक्ष आणि १० हजार ९८० अप्रत्यक्ष रोजगार लोकांना मिळाला आहे. गेल्या पाच वर्षांत  कार्यान्वित झालेल्या उद्योगांमधून ३ हजार ४९५ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत रोजगाराचा मुद्दा सर्वाधिक चर्चिला गेला. मिहान-सेझमध्ये २५ युवकांना रोजगार दिल्याचा दावा सत्ताधारी करीत होते, तर विरोधक गेल्या पाच वर्षांत एकही नवीन उद्योगातून रोजगार मिळाला नाही, असा आरोप करीत आहेत. या पाश्र्वभूमीवर लोकसत्ताने ‘रियालिटी चेक’ केले असता येथे गेल्या १० वर्षांपासून आतापर्यंत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळून २३ हजार ७९५ रोजगार मिळाले आहेत. गेल्या पाच वर्षांच्या काळात कार्यान्वित झालेल्या कंपन्यांनी ३ हजार ४९५ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार दिले आहेत.  महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने ३१ मार्च २०१९ ला मिहान-सेझमध्ये रोजगाराच्या संधीची यादी अद्ययावत केली आहे. त्यानुसार सेझ आणि नॉन सेझमधील सुरू झालेल्या कंपन्या आणि बांधकाम सुरू असलेल्या कंपन्यांमधील स्थायी आणि अस्थायी तसेच अप्रत्यक्ष असा आजवर २३ हजार ७९५ लोकांना  रोजगार  मिळाला आहे. यामध्ये बोईंगचा एमआरओ मागील सरकारने मंजूर केला. तसेच एचसीएल देखील मागील सरकारने मिहानमध्ये आणले होते. मात्र, काम २०१६ पासून सुरू झाले. केंद्रात मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर रिलायन्स एअरोस्पेस मिहानमध्ये आले. या कंपनीने आतापर्यंत ५० रोजगार दिले. बहुचर्चित रामदेबाबा यांच्या पंतजली समूहाच्या कारखान्याची उभारणी सुरू आहे. त्यातून अजूनतरी एकाही युवकाला रोजगार मिळालेला नाही. रेल्वेच्या कॉन्कारचे काम २०१६ पासून सुरू झाले. हा प्रकल्प देखील २०१४ च्या आधीच आला. त्यात १० जणांना प्रत्यक्ष आणि ५०० लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे, असे एमएडीसीच्या अहवालात नमूद  आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीचा वचननामा जाहीर केला आहे. त्यात मागील पाच वर्षांत २५ हजार रोजगार दिल्याचे आणि पुढील पाच वर्षांत पुन्हा २५ हजार रोजगार देणार असल्याचे म्हटले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ५० हजार युवकांना रोजगार देणार असल्याचे सांगितले होते. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विदर्भ अ‍ॅडव्हॉन्टेज उपक्रम हाती घेऊन मिहान-सेझमध्ये गुंतवणूक आली. टीसीएस, इन्फोसिस आणि इतर अनेक बडय़ा कंपन्या येथे आणल्या. फडणवीस सरकारने विदर्भ अ‍ॅडव्हॉन्टेज बंद केले. त्यांनी केवळ रामदेबाबाच्या पतंजलीला आणि अनिल अंबानीच्या रिलायन्सला मिहानमध्ये जमीन दिली, असा आरोपही चव्हाण यांनी प्रचारसभेत केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 23 thousand people employed from mihan

ताज्या बातम्या