चार वर्षात २४ वाघ आणि ५६ बिबट्यांची शिकार!

वनविकास महामंडळाच्या पोर्ला वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या मारोडा जंगल परिसरात बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.

माहिती अधिकारात धक्कादायक वास्तव उघड

नागपूर : राज्यात वाघ आणि बिबट्यांच्या सभोवताल शिकारीचा फास आवळतच चालला असून गेल्या चार वर्षात  वीजप्रवाह आणि विषप्रयोगामुळे २४ वाघ आणि ५६ बिबट या सापळ्यात अडकले आहेत. शिकारी रोखण्यात वनखात्याची यंत्रणा अपयशी ठरत आहे.  माहिती अधिकारातून हे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना उघडकीस आलेल्या शिकारीच्या प्रकरणांची माहिती वनखात्याने दिली आहे. प्रत्यक्षात वाघ आणि बिबट्यांच्या अनेक शिकारी उघडकीस आलेल्या नाहीत. त्यातून समोर येणारी आकडेवारी यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील दोन महिन्यात नागपूर विभागाने अशा शिकारीची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात के ली आहे. सुमारे २९ आरोपींना  अटक करण्यात आली आहे. मानव-वन्यजीव संघर्ष हे आणखी एक कारण स्थानिक शिकारीमागे आहे. बहेलिया टोळीची मोठ्या प्रमाणात धरपकड के ल्यानंतर त्यांच्या कारवाया थंड झाल्या. त्यामुळे खातेही शांत झाले, पण गावात येणारे वाघ-बिबट, त्यांचे माणसांवर आणि त्यांच्या जनावरावर होणारे हल्ले, शेतपिकाचे होणारे नुकसान यामुळे स्थानिकांनी या वन्यप्राण्यांना मारण्यासाठी विषप्रयोग, वीजप्रवाहाचा वापर सुरू केला. राज्यात एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना दुसरीकडे वाघांच्या मृत्यूमध्येही राज्य दुसऱ्या क्र मांकावर आहे. त्यातही शिकारींचे प्रमाण अधिक आहे. वन्यजीव विभागात वाघांच्या संरक्षणासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दल आहे. प्रादेशिक विभागात दक्षता पथक आहे. तरीही खात्याची यंत्रणा वाघांच्या संरक्षणात कमी पडत आहे. हीच स्थिती बिबट्यांचीही आहे. बिबट्यांच्या मृत्यूमध्ये वाढ होत असताना त्यातही शिकारीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ज्या वाघ आणि बिबट्यांच्या बळावर व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यात पर्यटन सुरू आहे, त्यांच्या संरक्षणासाठी खात्याने आतातरी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

मारोडा जंगलात बिबट्याचा मृत्यू

वनविकास महामंडळाच्या पोर्ला वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या मारोडा जंगल परिसरात बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. वनकर्मचारी गस्तीवर असताना त्यांना मारोडा जंगल परिसरात बिबट मृतावस्थेत दिसला. सहायक वनसरंक्षक सोनल भडके, वनपरिक्षेत्राधिकारी पेंदाम, क्षेत्र अधिकारी कन्नमवार यांनी घटनास्थळी  पाहणी केली. बिबट्याच्या शरीरावर कोणतीही जखम आढळून आली नाही. 

वने व वन्यजीवांच्या सुरक्षेची जबाबदारी वनविभागावर आहे. वने आणि वन्यजीव विभागात क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वनगुन्हे आणि कायद्याबाबत स्वतंत्र व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. यातून घडणाऱ्या वने व वन्यजीव गुन्ह्याबाबत अधिक प्रभावीपणे काम करायला मदत होईल.

– यादव तरटे पाटील, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 24 tigers and 56 leopards hunted in four years akp