लोकसत्ता टीम

यवतमाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळात वावरणाऱ्यांची बँक अशी ख्याती असलेल्या येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकवर अखेर कारवाई सुरू झालीआहे. बँकेतील बहुचर्चित २४२ कोटी ५० लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी सोमवारी उशिरा रात्री बँकेशी संबंधित पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि खातेदार अशा २३ जणांविरोधात अमरावती येथील विशेष लेखापरीक्षक (वर्ग १ साखर) सुनीता सतीश पांडे यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये येथील अवधुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

बँकेची तब्बल २४२ कोटी ३१ लाख २१ हजार १९ रूपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक कर्मचारी, कर्जदार अशा २०६ जणांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.सोबतच बँकेने नियुक्त केलेले आठ मूल्यांकनकार, बँकेच्या पॅनलवरील तीन लेखापरिक्षक यांच्यावरही लेखापरीक्षणातून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

आणखी वाचा-मुलाने घर हिसकावून घेतले, आता कुठे जाणार? वृद्ध महिला पोहचली थेट विभागीय आयुक्तांकडे

बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत मर्जीतील सभासदांना कमी मूल्यांकन असणाऱ्या मालमतांचे वाढीव मूल्यांकन दाखवून कोट्यवधीचे कर्ज मंजूर करण्यात आले. बँकेचे तत्कालीन आणि विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही कर्ज प्रकरणे मंजूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अनेकांनी कोट्यवधींचे कर्ज उचलून त्याची परतफेड केली नाही. त्यामुळे बँक डबघाईस आली आणि ठेवीदारांचे कष्टाचे पैसे बुडाले. कर्ज बुडीत राहिल्याने बँक बंद पडली. त्यामुळे अवसायकांची नियुक्ती झाली. दरम्यान, बँकेतील गैरप्रकाराबाबत सहकार आयुक्त पुणे यांनी अमरावती येथील विशेष लेखापरीक्षक सुनीता पांडे यांच्याकडे २०२२ मध्ये चौकशी सोपविली. त्यांनी २०१६ पासूनच्या कर्जप्रकरणांची सखोल पडताळणी केली.

या चौकशीचा अंतिम अहवाल १६ जुलै २०२४ रोजी राज्याच्या सहकार आयुक्तांकडे सादर करण्यात आला, सुमारे दीड हजार पानांच्या या अहवालास आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर विशेष लेखापरीक्षकांनी हा अहवाल यवतमाळच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द केला. गुन्हे शाखेकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची परवानगी राज्याच्या अपर पोलीस महासंचालकांकडे मागण्यात आली. अपर महासंचालकांनी परवानगी दिल्यानंतर अखेर सोमवारी गुन्हे दाखल झाले.

आणखी वाचा-महाराष्ट्रात ‘कमिशनराज’! देशातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार; रमेश चेनिथल्ला यांची टीका

यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल

तक्रारीवरून पोलिसांनी बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कंचलवार, कमलकिशोर जयस्वाल, शिवनारायण भूतडा, हितेश गंडेचा, रवींद्र येरणे, विक्रम नानवाणी, प्रकाश पिसाळ, राजेन्द्र गायकवाड (नागपूर), यवतमाळ, नागपूर येथील प्रसिद्ध कंत्राटदार दीपक निलावार, विलास महाजन, पवन राऊत, सुदर्शन ढिलपे, प्रमोद सबनीस, स्वप्नील अमरी, सचिन माहुरे, योगेश नानवाणी, विमल दुर्गमवार, सुभाष तोटेवार, अशोक दुर्गमवार, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता विलास महाजन, मुल्यांकनकार सुरेन्द्र केळापूरे, संचालक ललीता निवल, बाबाजी दाते यांच्या कन्या व बँकेच्या अध्यक्ष विद्या शरद केळकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

या आरोपींसह अहवालात नमूद सर्व संचालक, सीईओंशी संबंधित अधिकारी, कर्जदारांशी संबंधितांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कंचलवार व त्यांच्या कुटुंबियांनी सर्वाधिक आर्थिक अनियमितता केल्याचे अहवालातून स्पष्ट होते. अशोक कंचलवार यांचे दीड वर्षांपूर्वीच निधन झाल्याने त्यांच्या नावे असलेल्या कोट्यवधीची रक्कम वसूल करण्याचाही प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगण्यात येते.