गोपनीय माहितीच्या आधारे भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात राबवलेल्या विशेष अभियानात ३ जहाल नक्षल्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांवर एकूण १० लाखांचे बक्षीस होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नागपूर : घरात एकट्या तरुणीवर अत्याचार ; अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी

रमेश पल्लो (२९) रा. कोयार ता. भामरागड, तानी ऊर्फ शशी चमरू पुंगाटी (२३) रा. पद्दूर ता. भामरागड, अर्जुन ऊर्फ महेश नरोटे (२७) रा. झारेवाडा ता. एटापल्ली अशी अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या कोयारच्या जंगलात आज गडचिरोली पोलिसांचे विशेष अभियान पथक सी ६० व सीआरपीएफ बटालियन ३७ च्या जवानांनी राबवलेल्या संयुक्त अभियानादरम्यान दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात यश आले. सोबतच एटापल्ली तालुक्यातील हेडरी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या गट्टा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील झारेवाडा जंगल परिसरात नक्षलविरोधी विशेष अभियान पथकाच्या जवानांनी एका जहाल नक्षलवाद्याला अटक केली.

हेही वाचा – शिवसेनेचा दसरा मेळावा कुणीही हायजॅक करू शकत नाही ; गद्दारांना आदित्य ठाकरेंनी सुनावले

अटक करण्यात आलेल्या रमेश पल्लो या नक्षल्यावर ४ लाखांचे बक्षीस होते. २०१९ मध्ये नक्षल चळवळीत भरती झालेला रमेश कंपनी १० चा शीघ्र कृतिदल आणि स्काऊट सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर खून, चकमक, जाळपोळ प्रकरणी एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. तानी ऊर्फ शशी चमरू पुंगाटी २०१५ मध्ये नक्षल चळवळीत भरती झाली. तिच्यावर ४ लाखांचे बक्षीस होते. २०१६ ते १९ पर्यंत ती प्लाटून पदावर कार्यरत होती. त्यानंतर कंपनी १० मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर खून, चकमक, जाळपोळ प्रकरणात एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. तर गट्टा मदत केंद्रातील झारेवाडा जंगल परिसरातून अटक करण्यात आलेल्या अर्जुन ऊर्फ महेश नरोटे या नक्षाल्यावर २ लाखांचे बक्षीस होते. हा २०१० ते १३ पर्यंत पेरमिली दलममध्ये कार्यरत होता. त्यानंतर तो प्लाटून क्र. १४ मध्ये कार्यरत होता. २०१८ पर्यंत सिरोंचा दलम आणि मग भामरागड दलममध्ये कार्यरत होता. त्याच्यावर खून, चकमक, जाळपोळ, दरोडा व चोरी प्रकरणात एकूण २४ गुन्ह्यांची नोंद आहे.

गडचिरोली पोलिसांचे हे मोठे यश मानले जात असून २०२१-२२ दरम्यान पोलिसांनी राबवलेल्या विशेष अभियानात एकूण ५७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 jahal naxalites arrested in special operation reward of 10 lakhs amy
First published on: 28-08-2022 at 19:58 IST