नागपूर : प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा निर्माण व्हावी, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र, आज विदर्भातील बहुतांश गोशाळांची आर्थिक स्थिती बघता जनावरांना सांभाळणे कठीण झाले आहे. गेल्या दोन वर्षात विदर्भातील २२५ पैकी ३० गोशाळा बंद झाल्या आहेत. तर ५० पेक्षा जास्त गोशाळा अनुदान मिळत नसल्यामुळे बंद होण्याच्या वाटेवर आहेत.

सध्या राज्यात ५१८ गोशाळा असून त्यातील २२५ गोशाळा या विदर्भात आहेत. त्यातील अनेक गोशाळांची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे. शिवाय विविध दानदात्यांकडून मदत कमी झाल्यामुळे जनावरांची काळजी घेणे अवघड झाले आहे.

विदर्भात मोठ्या प्रमाणात अशलेल्या भाकड जनावरांची संख्या लक्षात घेता आघाडी सरकारने ‘गोवंश संवर्धन केंद्रे’ सुरू करण्याची घोषणा करुन त्यांना अनुदान देण्याचे जाहीर केले होते. आदेशही काढण्यात आले मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. जनावरांच्या पालनपोषणावर होणारा खर्च गोशाळा चालवणाऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे गोशाळा चालविणे कठीण झाले आहे. माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने युतीच्या काळात अनुदानासाठी १०७ गोशाळांची निवड केली होती. परंतु आजपर्यंत या गोशाळांना अनुदान मंजुरीचे पत्र मिळाले नाही.

राज्यासह विदर्भात गोशाळांना अनुदान नसल्यामुळे गेल्या दोन वर्षात ३० गोशाळा बंद झाल्या आहेत. – डॉ. सुनील सूर्यवंशी, गोसेवा महासंघाचे प्रमुख.