आवश्यकतेपेक्षा तिप्पट साठा करणार; १३०० नवीन सिलेंडरची खरेदी

नागपूर : करोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासनाकडून आत्तापासूनच उपाययोजना केल्या जात आहेत. प्राणवायूचा तुटवडा जाणवू नये म्हणून गरजेच्या तिप्पट साठा केला जाणार आहे तसेच शहरात एकूण ३० ठिकाणी प्राणवायू केंद्र सुरू केले जाणार असून तेथून रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यासाठीही व्यवस्था केली जाणार आहे.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यात तिसऱ्या लाटेच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सुलभपणे प्राणवायू उपलब्ध व्हावा म्हणून ३० केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर ज्यांना प्राणवायूची आवश्यकता आहे त्यांना तो तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल तसेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठीही मदत केली जाईल. यासाठी १०० प्राणवायू कॉन्सनट्रेटर यंत्र सज्ज ठेवण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार आणखी १०० यंत्र जिल्हा निधीमधून खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे, असे राऊत यांनी सांगितले.

कोविडसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच ग्रामीण रुग्णालयांसाठी आवश्यकतेनुसार ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी ऑक्सिजन निर्मिती सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच द्रवरूप प्राणवायू साठवण्यासाठी मध्यवर्ती केंद्र उभारण्यात येणार आहे.

तसेच १ हजार ३७५ नवीन ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करण्यात येणार आहेत. जिल्ह्य़ासाठी दररोज १६० मेट्रिक टन प्राणवायूची आवश्यकता असून तिसऱ्या लाटेसाठी तीनपट अधिक साठा उपलब्ध केला जाणार आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

बैठकीला विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार,  जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उद्योगसह संचालक धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

दररोज पन्नास हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट

ग्रामीण तसेच शहरी भागा मिळून दररोज ५० हजारपेक्षा जास्त पात्र नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवून नियोजन करावे. त्यासाठी केंद्राची संख्या वाढवावी लागणार आहे. शहरातील किमान २५ खासगी रुग्णालयात लसीकरणाची सोय केल्यास उद्दिष्ट साध्य होऊ शकेल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. सध्या ग्रामीण भागात १८ वर्षांवरील सरासरी ४० टक्के नागरिकांना पहिला तर ९ टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

२०० खाटा बालकांसाठी राखीव

अमरावती रोड येथे ६०० बेड्स नव्याने उपलब्ध होणार असून शहरात एकूण १ हजार ८०० बेड्स उपलब्ध होतील. त्यामुळे कोविड रुग्णांच्या उपचारात अडचणी येणार नाही, असे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. यात दोनशे खाटा बालकांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.