अकोला : देशात संविधान निर्मितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तीन हजार महिलांकडून ७५ हजार वेळा संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. भारतीय बौद्ध महासभा आणि ॲड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून हा विशेष कार्यक्रम रविवारी घेण्यात आला.

शहरातील तापडिया नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणावर आयोजित कार्यक्रमात ॲड. प्रकाश आंबेडकर, प्रा.अंजली आंबेडकर, बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.जी.वानखडे, प्रमोद देंडवे, ज्ञानेश्वर सुलताने, नीलेश देव आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतंत्रात्मक, गणराज्य घडविण्यासाठी देशाच्या संविधानाचे उद्देशिका ही महत्त्वाची आहे. त्यांचा प्रत्येकाने अंगीकार केला पाहिजे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. प्रा. अंजली आंबेडकर यांनी देशाच्या संविधानचा अमृत महोत्सवाचा विसर अनेकांना पडल्याची खंत व्यक्त केली. संविधानचे रक्षण ही काळाची गरज आहे. भारतीयांच्या हक्कांचे रक्षण होण्यास मोलाची मदत लाभेल, असे प्रा. अंजली आंबेडकर म्हणाल्या.

हेही वाचा…अश्लील चित्रफितींबाबत तीन वर्षांत दीड लाखांवर तक्रारी

२६ जानेवारी २०२५ रोजी भारतीय प्रजासत्ताकला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने भारतीय संविधानाचे महत्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तीन हजार महिलांच्या उपस्थितीत ७५ हजार वेळा संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी देव यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

हेही वाचा…वर्धा : गांधींच्या जिल्ह्यातून गोडसे विचार हद्दपार करा, माजी पालकमंत्री सुनिल केदार म्हणतात, “महात्म्यांचा तिरस्कार…”

महिलांनी साकारला तिरंगा

विशेष कार्यक्रमात केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या या तिरंगी रंगाच्या साड्यांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अतिशय शिस्तबद्धपणे महिलांनी रांगेत बसून तिरंगा साकारला होता.