धूम्रपान न करणाऱ्या ३५ टक्के रुग्णांनाही फुफ्फुसाचा कर्करोग

धूम्रपान करणाऱ्यांच्या सहवासात असताना या रुग्णांच्या नाका-तोंडात धूर जाऊन त्यांना हा आजार झाल्याची शक्यता आहे.

(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयाचे निरीक्षण; आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस

धूम्रपान न करणाऱ्या ३५ टक्के रुग्णांनाही फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर रुग्णालयाच्या निरीक्षणात आढळून आले आहे. धूम्रपान करणाऱ्यांच्या सहवासात असताना या रुग्णांच्या नाका-तोंडात धूर जाऊन त्यांना हा आजार झाल्याची शक्यता आहे. ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने अलीकडेच २०२० पर्यंत भारतात १७ लाखाहून अधिक नवीन कर्करोगाचे रुग्ण आढळतील व या आजाराने ८ लाख मृत्यू होण्याचा इशारा दिला आहे. देशात सर्वत्र तंबाखूजन्य पदार्थाचे वाढते सेवन आणि वाढते धूम्रपान हे त्याचे प्रमुख कारण आहे. उपराजधानीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयात विदर्भासह शेजारच्या राज्यातून संशयित व कर्करोगाने ग्रस्त असलेले अनेक जण उपचारासाठी येतात. त्यांच्या नोंदीनुसार, २०१४ पासून २०१८ पर्यंत पाच वर्षांत त्यांच्याकडे एकूण ६५३ फुफ्फुसाच्या कर्करुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णांमध्ये ३५ टक्के रुग्णांचा इतिहासात धूम्रपानाचा नव्हता. धूम्रपान न करणाऱ्यांतील ८० ते ९० टक्के रुग्णांनी काही कालावधी धूम्रपान करणाऱ्याच्या शेजारी घालवला. इतर जण चुलीवर जेवण करणे किंवा पाणी गरम करताना धुराच्या संपर्कात आले होते. त्यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगग्रस्तांत बहुतांश जणांच्या आजाराचे कारण हे धूम्रपान किंवा त्यांच्या शेजारी उभे राहिल्याने त्यांच्या नाका-तोंडात धूर जाणे हा असल्याचे प्राथमिक निरीक्षणातून पुढे येत आहे. दरम्यान, नागपूरसह विदर्भात गुटखा, पानमसालासह तंबाखूजन्य खऱ्र्यावर प्रतिबंध असतानाही त्याची सर्रास विक्री होत असल्यानेही कर्करुग्ण वाढताना दिसत आहेत. सर्वच प्रकारच्या कर्करोगावर नियंत्रणासाठी तंबाखूजन्य पदार्थासह धूम्रपान कमी करणे व प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे आवश्यक असल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर रुग्णालयाचे संचालक डॉ. सुभ्रजित दासगुप्ता यांनी गुरुवारच्या पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी डॉ. बी.के. शर्मा, डॉ. देवीप्रसाद सेनगुप्ता, डॉ. तप्तशील सप्रे उपस्थित होते.

स्त्रियांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढले

या निरीक्षणात सर्वाधिक कर्करुग्ण हे ३० ते ५० वयोगटात आढळत असल्याचे पुढे आले आहे. सोबत ग्रामीणच्या तुलनेत शहरातील तरुणींसह स्त्रियांमध्ये धूम्रपानाचे व्यसन वाढत आहे. शहरातील अनेक भागात हल्ली पुरुषांसोबत स्त्रियाही धूम्रपान करताना आढळतात. सध्या पुरुष आणि महिलांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण प्रत्येक शंभरात अनुक्रमे ८० आणि २० आढळते, परंतु पुढे ही संख्या शहरात लवकरच समसमान होण्याचा धोका डॉ. बी.के. शर्मा यांनी वर्तवला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 35 of patients who do not smoke also have lung cancer