अकोला : सर्वांना वीज पुरवठा करून ऊर्जा पुरवणाऱ्या महावितरणलाच चोरट्यांनी जबरदस्त ‘शॉक’ दिला आहे. विविध मार्गाने लाखो रुपयांची वीज चोरी केल्याचा प्रकार समोर आला. या वीज चोरी विरूद्ध महावितरणच्या अकोट विभागात मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ३७ जणांनी वीज चोरी केल्याचे उघड झाले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून १० लाख रुपयाचा दंड ठेठावण्यात आला. दंड न भरल्यास त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजय कुटे यांनी दिली.
महावितरणच्या वीज वितरण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात विजेची हानी होते. त्यामध्ये वीज चोरीचे प्रमाण सर्वाधिक असते. वीज चोरी रोखण्याचे आव्हान महावितरण प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. अकोला परिमंडळातील अकोट विभागात वीज चोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष नोहिम राबविण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिले आहे. त्यामुळे अधीक्षक अभियंता प्रतिक्षा शंभरकर यांच्या मार्गदर्शनात आणि कार्यकारी अभियंता संजय कुटे यांच्या पुढाकाराने अकोट विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यांना वीज चोरी पकडण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून दररोज केलेल्या कारवाईचा विभागीय कार्यालयाकडून आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे अकोट विभागातील सावरा, चोहोट्टा, पणज आणि अकोट शहरात केलेल्या धडक कारवाईत १० लाखाची वीज चोरी होत असल्याचे उघड करण्यात आले.
कलम १३५ नुसार कारवाई
वीज चोरी करताना पकडले गेलेल्या विद्युत कायदा २००३ च्या तरतुदीनुसार कलम १३५ नुसार कारवाई केली जाते. पहिल्यांदा तडजोडपोटी आर्थिक स्वरूपातील दंड आकारला जातो, तर दुसऱ्यांदा कारवाई झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल होतो. शिवाय कायद्यात तीन वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. महावितरणची वीज चोरीविरूध्द असलेली मोहिम यापुढे नियमित चालणार असून सुरळीत वीज पुरवठ्यास अडथळा ठरणाऱ्या आणि महावितरणचे आर्थिक नुकसान करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही कार्यकारी अभियंता यांनी स्पष्ट केले.
विविध माध्यमांद्वारे वीजचोरी
वीजचोरी विविध माध्यमांद्वारे पूर्ण केली जाते. प्राथमिक पद्धतींपासून थेट वीज तारावर आकडे टाकून वीज चोरी केली जाते. संगणकीकृत इलेक्ट्रिकल मीटरमध्ये फेरफार करून सुद्धा वीज चोरी करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेक वेळा महावितरण यंत्रणेतील कर्मचाऱ्यांकडूनच वीज चोरीचे मार्ग व त्यातून पळवाटा दाखवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार देखील घडले आहेत.

