चंद्रपूर: वेकोली बल्लारपूर क्षेत्रअंतर्गत असलेल्या धोपटाळा युजी टू ओसी कोळसा खाणीसाठी अधिग्रहण प्रकीयेतून सुटलेल्या कोलगांव व मानोली येथील शेतकऱ्यांच्या उर्वरीत ३७४ हेक्टर शेतजमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वारंवार केला होता. कोलगांव येथील बहुतांश जमिनींचे अधिग्रहण झाल्याने व हे गांव पुरप्रभावित असल्याने पावसाळ्यात नदी व नाल्यांना पूर येवून गांव पुराच्या पाण्याने वेढत असल्यामुळे उर्वरित ३६० हेक्टरवरील शेती करणे कोलगाववासीय शेतकऱ्यांना कठीण झाले होते. त्यामुळे या उर्वरित जमिनीचे अधिग्रहण करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. हंसराज अहीर यांच्या हस्तक्षेप व पाठपुराव्यामुळे आता कोलगांव व मानोली येथील अनुकमे ३६० व १४ हेक्टर शेतजमिनीला सेक्शन-४ लागू केल्यानंतर हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी हंसराज अहीर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेवून न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ देवून व मिठाई वाटून कृतज्ञता व्यक्त करीत सन्मान केला. हेही वाचा >>> गडचिरोली: रस्ता बांधकाम न करताच सहा कोटींची उचल!; जाणून घ्या काय आहे प्रकरण… यावेळी कोलगावचे सरपंच पुरूषोत्तम लांडे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजु घरोटे, मधुकर नरड, ॲड. प्रशांत घरोटे, अक्षय निब्रड, रमेश पाटील लांडे, राजु पिपळकर, विकास दिवसे, प्रशांत मोरे, जगदिश लांडे, संजय किगरे, कु. निब्रड यांच्यासह कोलगांव व मानोली येथील प्रकल्पग्रस्त शेतकरीबांधव उपस्थित होते. कोलगांवच्या पुनर्वसनाबाबत वेकोलि प्रबंधन सकारात्मक कार्यवाही करीत असल्याचे अहीर यांनी उपस्थित प्रकल्पग्रस्तांना यावेळी सांगीतले.