scorecardresearch

देशातील ५२ व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रफळात घट ; भारतीय वनसर्वेक्षण अहवालातील माहिती

देशातील २० व्याघ्रप्रकल्पांचे क्षेत्रफळ १.२८ चौरस किलोमीटरवरून २३८.८० चौरस किलोमीटपर्यंत वाढले आहे.

नागपूर :  भारतात वाघांची संख्या वाढल्यानंतर जेवढा आनंद व्यक्त करण्यात आला होता, तेवढाच आता वनक्षेत्रात झालेल्या वाढीनंतर करण्यात आला आहे. देशाचे क्षेत्रफळ सुमारे दोन हजार २६१ चौरस किलोमीटरने वाढले आहे, मात्र, यासोबतच देशातील ५२ व्याघ्रप्रकल्पांचे वनक्षेत्र गेल्या दहा वर्षांत २२.६२ चौरस किलोमीटरने कमी झाले आहे. यामुळे व्याघ्रसंवर्धनाचे नवे आव्हान निर्माण झाले आहे.

भारतीय वनसर्वेक्षण अहवालात देशातील वनक्षेत्राची स्थिती जाहीर करण्यात आली. यात वनक्षेत्रात दाखवलेली वाढ निश्चितच सुखावणारी आहे. मात्र, याच अहवालात काही इशारे देखील देण्यात आले आहेत.

देशातील २० व्याघ्रप्रकल्पांचे क्षेत्रफळ १.२८ चौरस किलोमीटरवरून २३८.८० चौरस किलोमीटपर्यंत वाढले आहे. मात्र, उर्वरित ३२ व्याघ्रप्रकल्पांचे क्षेत्रफळ ०.६ चौरस किलोमीटर ते ११८.९७ चौरस किलोमीटपर्यंत कमी झाले आहे.

मागील दहा वर्षांत सिंहांसाठी उपयुक्त वनक्षेत्रात ३३.४३ चौरस किलोमीटरने घट झाली आहे. वाघांचा भ्रमणमार्ग सुमारे १४ ते ८९.३७ चौरस किलोमीटरमध्ये पसरला आहे. तो देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ०.४३ टक्के आहे. वाघाच्या भ्रमणमार्गातील वनक्षेत्र एक हजार १७५.१२ चौरस किलोमीटरमध्ये पसरले असून, ते देशाच्या एकूण वनक्षेत्राच्या १.६२ टक्के इतके आहे. भारतातील ५२ व्याघ्रप्रकल्पांमध्ये मागील दहा वर्षांत तेलंगणामधील कावल अभयारण्यात सर्वाधिक ११८.९७ चौरस किलोमीटरची घट नोंदवण्यात आली.  कर्नाटकातील भद्रामध्ये ५३.०९ चौरस किलोमीटरची घट नोंदवण्यात आली. पश्चिम बंगालमधील सुंदरबनमध्येही ४० चौरस किलोमीटरने वनक्षेत्र कमी झाले आहे. त्याचवेळी मागील दहा वर्षांत सर्वाधिक वाढ नोंदवणाऱ्या व्याघ्रप्रकल्पात बंगालमधील बक्सा, तामिळनाडूतील अन्नामलाई, छत्तीसगडमधील इंद्रावती अभयारण्याचा समावेश आहे. बक्साचे वनक्षेत्र २३८.८ चौरस किलोमीटरने, अन्नामलाईचे वनक्षेत्र १२०.७८ चौरस किलोमीटरने आणि इंद्रावतीचे वनक्षेत्र ६४.४८ चौरस किलोमीटरने वाढले आहे. व्याघ्रप्रकल्पासोबतच गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यान आणि गीर वन्यजीव अभयारण्याच्या वनक्षेत्रात ३३.४३ चौरस किलोमीटरने वनक्षेत्र कमी झाले आहे. गीर राष्ट्रीय उद्यानात २.२० चौरस किलोमीटर आणि गीर वन्यजीव अभयारण्यात ३१.२३ चौरस किलोमीटरने वनक्षेत्रातील घट नोंदवण्यात आली.

सर्वाधिक वाढ..

मागील दहा वर्षांत सर्वाधिक वाढ नोंदवणाऱ्या व्याघ्रप्रकल्पात बंगालमधील बक्सा, तामिळनाडूतील अन्नामलाई, छत्तीसगडमधील इंद्रावती अभयारण्याचा समावेश आहे.

आणि सर्वाधिक घट..

भारतातील ५२ व्याघ्रप्रकल्पांमध्ये मागील दहा वर्षांत तेलंगणामधील कावल अभयारण्यात सर्वाधिक ११८.९७ चौरस किलोमीटरची घट नोंदवण्यात आली. 

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 52 tiger project area decrease in across in india zws