अकोला : राज्यात बालविवाह कुप्रथेचे संकट कायम असून गत सहा वर्षात ५४२१ बालविवाह थांबवण्यात आले आहे. या प्रकरणांमध्ये तब्बल ४०१ गुन्हे दाखल झाले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लावण्यात येणारे बालविवाह रोखण्याचे आवाहन प्रशासनापुढे राहणार आहे. गावात बालविवाह होऊ नये, यासाठी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये बालविवाह प्रतिबंध अधिनीयम २००६ कार्यान्वित असून महाराष्ट्र शासनाने बालविवाह प्रतिबंध नियम २०२२ तयार केला आहे. अक्षय्य तृतीया ३० एप्रिल २०२५ रोजी आहे. या दिवशी राज्यात मोठ्या प्रमाणात सामूहिक विवाह सोहळे तसेच व्यक्तिगत विवाह सोहळे आयोजित केले जातात.
यामध्ये बालविवाह सुद्धा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी हे शहरी भागासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असून ग्रामसेवक हे ग्रामीण भागासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत.त्यांना सहायक म्हणून अंगणवाडी सेविका आहेत.गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समित्या गठित असून सरपंच हे ग्राम बालसंरक्षण समितीचे अध्यक्ष असतात. पोलीस पाटील, आशा सेविका हे त्या समितीचे सदस्य, तर अंगणवाडी सेविका सदस्य सचिव आहेत. त्यामुळे गावात बालविवाह तसेच बालकांच्या संबंधित कोणतीही अघटित घटना होणार नाही, याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.
११ एप्रिल रोजी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी ग्रामसेवक यांच्या जिल्हा स्तरीय बालविवाह प्रतिबंधक कार्यशाळेमध्ये सर्व ग्रामसेवक यांना गावात बालविवाह होऊ नये, यासाठी जागरूक राहण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिल्या आहेत. गावात विवाह ठरले असल्यास मुला-मुलींच्या वयाची खातरजमा सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांनी करणे आवश्यक आहे.बालविवाह संदर्भात काही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
… तर लग्न लावणाऱ्यांपासून वऱ्हाडीपर्यंत सगळ्यांनाच शिक्षा
बालविवाह झाल्यास विवाह लावणारे भटजी, मौलवी, पादरी, भंतेजी तसेच मंडपवाले, वाजंत्री, विवाह सोहळ्यात सहभागी होणारी वऱ्हाडी मंडळी, मंगल कार्यालय मालक, वर-वधुचे आई वडील यांना शिक्षा होऊ शकते. गावात बालविवाह झाल्यास सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.