नागपुरात गेल्या साडेसहा वर्षांत शहरातील ५८ हजार २४ नागरिकांना श्वानांनी चावा घेतला. माहितीच्या अधिकारातून ही बाब सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणली. हेही वाचा- उदयनराजेंच्या राज्यपालांविरोधातील भूमिकेचे संजय गायकवाडांकडून समर्थन; म्हणाले, “शिवरायांबाबतच्या वक्तव्यांमुळे…” महापालिकेच्या सर्वेक्षण शहरातील दहा झोनमध्ये ८१ हजार १८८ श्वान असून त्यातील ७१ हजार १८५ भटके आहेत. या श्वानांपैकी १६ टक्के श्वानांची नसबंदी झाली. हे सर्वेक्षण २०१७ दरम्यानचे आहे. तर महापालिका हद्दीत २०१६- १७ या आर्थिक वर्षांत ९ हजार ९३० जणांना श्वानांनी चावा घेतला. २०१७- १८ मध्ये ९ हजार ८६०, २०१८- १९ मध्ये ११ हजार ६३३, २०१९- २० मध्ये १२ हजार ४८८, २०२०- २१ मध्ये २ हजार ५८४, २०२१- २२ मध्ये ६ हजार ८०६ तर एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२२ दरम्यान ४ हजार ७२३ जणांचा श्वानांनी चावा घेतला. या सर्व रुग्णांना महापालिकेने १ लाख ५१ हजार ३५८ ॲन्टी रॅबीज लस दिली.