लोकसत्ता टीम

गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या धान खरेदीत ६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महामंडळाचे गडचिरोली येथील तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांच्यासह महामंडळाच्या तत्कालिन कनिष्ठ सहायकास अटक केली आहे. न्यायालयाने दोघांनाही १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गजानन रमेश कोटलावार(३६) व व्यंकटी अंकलू बुर्ले(४६) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. कोटलावार हा प्रादेशिक व्यवस्थापक तर व्यंकटी बुर्ले हा मार्कंडा(कं) येथील खरेदी केंद्राचा केंद्रप्रमुख आणि कनिष्ठ सहायक होता.

आणखी वाचा-३०० कोटींच्या मालमत्तेच्या वाद, सुनेनेच दिली सासऱ्याच्या खुनाची सुपारी

किमान आधारभूत किमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी पिकवलेला धान आदिवासी विकास महामंडळामार्फत विविध खरेदी केंद्रांवर खरेदी केला जातो. या धानाचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या राईस मिलर्सना बँक गॅरंटीच्या प्रमाणात भरडाईसाठी वितरण केले जाते. वितरित केलेल्या धानाचे आदेश मिलर्स आणि खरेदी केंद्रांचे केंद्रपमुख यांच्या स्वाक्षरीने वजन पावत्यांसह उपप्रादेशिक कार्यालयास सादर केले जातात. त्यानंतर मिलर्स उचल केलेल्या धानाची भरडाई करुन तयार केलेला तांदूळ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या अधिनस्थ गोदामात जमा करतात. जमा केलेल्या तांदळाच्या स्वीकृत पावत्या मिलर्सद्वारे प्रादेशिक कार्यालयात जमा करण्यात येतात. परंतु काही अधिकारी यात गैरप्रकार करुन आपले उखळ पांढरे करतात.

असाच गैरप्रकार चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा(कं) येथील धान खरेदी केंद्रावर झाला. पणन हंगाम २०२२-२३ मध्ये या केंद्रावर मोठा अपहार झाल्याच्या तक्रारीनंतर आदिवासी विकास महामंडळातर्फे चौकशी करण्यात आली. त्यात अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या होत्या. मार्कंडा केंद्रावर ५९९४७.६० क्विंटल्‍ धानाची खरेदी झाली होती. परंतु प्रत्यक्षात ३१५३२.५८ क्विंटल धान मिलर्सना देण्यात आले. मात्र, मिलर्सना दिलेल्या एकूण वितरण आदेशापैकी २८४१५.०२ क्विटल धान प्रतिक्विंटल२०४० रुपये याप्रमाणे ५ कोटी ७९ लाख ६६ हजार ६४० रुपये किंमतीचा धान मिलर्सना प्राप्त झाला नाही. शिवाय हे धान गोदामात देखील शिल्लक नव्हते. शिवाय महामंडळातर्फे पुरविण्यात आलेल्या एकूण बारदाण्यापैकी ७१ हजार ३८ बारदाणे, प्रति बारदाणा ३२ रुपये ७६ पैसे याप्रमाणे २३ लाख २७ हजार २०४ रुपयांचा अपहार करण्यात आला. धान आणि बारदाण्याचा हा अपहार एकूणण् ६ कोटी २ लाख ९३ हजार ८४५ रुपये किमतीचा असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. याप्रकरणी व्यवस्थापक गजानन कोटलावार यांना ८ ऑगस्ट २०२३ रोजी निलंबित करण्यात आले होते.

आणखी वाचा-थरार! शेतकऱ्याचा हल्ला अन् चवताळलेल्या बिबट्याकडून पाठलाग…

या अपहारास मार्कंडा(कं) खरेदी केंद्राचे तत्कालिन केंद्रप्रमुख व्यंकटी बुर्ले, विपणन निरीक्षक राकेश मडावी, प्रभारी उपप्रादेशिक व्यवस्थापक व्ही.ए.कुंभार, तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापकांनी आष्टी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी भादंवि कलम ४२०,४०९, ४६५,४६८, ४७१,३४ अन्वये गुन्हे दाखल केले. त्यानंतर आज गजानन कोटलावार व व्यंकटी बुर्ले यांना अटक करण्यात आली. चामोर्शी न्यायालयाने त्यांना १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी राकेश सहदेव मडावी यालादेखील ताब्यात घेण्यात आले असून, विचारपूस सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोबतच या घोटाळ्याचे तार जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असल्याचे बोलले जात आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड, उपनिरीक्षक सरिता मरकाम, बालाजी सोनुने यांनी ही कारवाई केली.