नागपूरः राज्यातील काही भागात उकाडा वाढला असतांनाच दुसरीकडे महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील ६६० मेगावॉटचा संच क्रमांक ८ तांत्रिक कारणाने (१४ मे) पासून बंद पडला आहे. राज्यात विजेची  मागणी अचानक वाढल्यास वीज पुरवठ्यावर परिणामाची शक्यता आहे.

राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडत असून काही भागात चांगलेच उन्ह तापत आहे. अवकाळी पाऊस पडणाऱ्या भागातही दुपारी चांगलाच उन्ह पडत असून रात्री अधून- मधून पाऊस पडतो. उकाड्यामुळे राज्यात सर्वत्र पंखे, वातानुकुलीत यंत्रासह विद्युत उपकरणांचा वापर वाढला. दरम्यान राज्यात अधून- मधून अचानक विजेची मागणी वाढताना दिसत आहे.

हेही वाचा >>>Video: शेतात सुरू होती धानकापणी…समोर उभे ठाकले साक्षात वाघोबा….

दरम्यान महानिर्मितीच्या नागपुरातील कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पातील कोराडीतील ६६० मेगावॉटचा संच क्रमांक ८ बॉयलर ट्यूब लिकेजमुळे १४ मे रोजी बंद पडला. संच बंद पडल्याने येथील वीज निर्मिती सुमारे ६०० मेगावॉटने कमी झाली. त्यामुळे रोजच्या १ हजार ९०० मेगावॉट ऐवजी सध्या येथे १ हजार ३१२ मेगावॉटच वीज निर्मिती होत आहे. संच दुरूस्तीला आणखी काही दिवस लागणार आहेत. दरम्यान राज्यात शुक्रवारी (१७ मे) विजेची मागणी सुमारे २७ हजार मेगावॉटच्या जवळपास होती. त्यापैकी २३ हजार ७०० हजार मेगावॉटची मागणी फक्त महावितरणची होती. मुंबईचीही मागणी ४ हजार मेगावॉटच्या जवळपास होती. दोन दिवसांत हा संच सुरू होणार असल्याचा दावा महानिर्मितीच्या जनसंपर्क विभागाने केला आहे. तर महावितरणच्या जनसंपर्क विभागाने सध्या मागणी कमी असून आवश्यक वीज उपलब्ध असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>>सावधान! राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा

सर्वाधिक वीज निर्मिती महानिर्मितीकडून

राज्यात शुक्रवारी दुपारी ३ वा. सर्वाधिक ८ हजार ४२९ मेगावॉट वीज निर्मिती महानिर्मितीकडून होत होती. त्यात औष्णिक विद्युत प्रकल्पांतून ७ हजार ४०७ मेगावॉट, उरन गॅस प्रकल्पातून १३० मे. वॉ., कोयना जलविद्युत प्रकल्पातून ८३९ मे. वॉ., सौरऊर्जा प्रकल्पातून ७५ मे. वॉ.चा समावेश होता. खासगी प्रकल्पांपैकी अदानीकडून २ हजार १८५ मे. वॉ., जिंदलकडून १ हजार ८८ मे. वॉ., आयडियलकडून २३२ मे. वॉ., रतन इंडियाकडून १ हजार ७४ मे. वॉ., एसडब्लूपीजीएलकडून ४९१ मे. वॉ. वीज निर्मित होत होती. केंद्राच्या वाट्यातून राज्याला ९ हजार ३२३ मेगावॉट वीज मिळत होती.

वारंवार वीज निर्मिती संच बंद का?

महानिर्मितीच्या कोराडी केंद्रातील ६६० मेगावाॅटचा संच क्रमांक ८ मध्ये बाॅयलर ट्यूब लिकेज होऊन तो ४ मे रोजी बंद पडला होता. त्यानंतर पून्हा बाॅयलर ट्यूब लिकेज होऊन हा संच पून्हा बंद पडला. दरम्यान निकृष्ठ कोळसा वापरल्या जात असल्याने हा तांत्रिक दोष वारंवार येत असल्याची लोकसत्ताकडे तक्रार आली आहे. या विषयावर महानिर्मितीच्या संबंधित अधिकाऱ्यांना तीन दिवसांपासून वारंवार विचारना केल्यावरही त्यावर प्रतिसाद मिळाला नाही.