राज्यात आठ जलदगती बाललैंगिक गुन्हे तपासणी युनिट

राज्यात गृह विभागाकडून केंद्र सरकारच्या निर्भया योजनेअंतर्गत मिळालेल्या ५३ कोटींच्या निधीतून आठ युनिट स्थापन करण्याचे ठरवले आहे

तिघांचे आज उद्घाटन; तीन नवीन युनिट लवकरच

नागपूर : निर्भया योजनेअंतर्गत राज्यातील विविध न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत ८ बाललैंगिक गुन्ह्य़ाशी संबंधित स्वतंत्र तपासणी युनिट तयार होत आहेत. यापैकी नांदेड आणि कोल्हापूरला हे युनिट सुरू असून उद्या २२ ऑक्टोबरला आणखी तीन प्रयोगशाळांचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने होईल. याशिवाय भविष्यात आणखी तीन जिल्ह्य़ात हे युनिट होईल, अशी माहिती  गृह विभागाचे महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) संदीप बिश्नोई यांनी दिली.

नागपूरच्या प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील पत्रपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी या विभागाच्या प्रभारी संचालक डॉ. संगीता घुमटकर, उपसंचालक विजय ठाकरे उपस्थित होते.

संदीप बिश्नोई म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने बाल लैंगिक गुन्हेसंबंधित आरोपपत्र ६० दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार झटपट डीएनएसह इतर तपासणीसाठी राज्यात गृह विभागाकडून केंद्र सरकारच्या निर्भया योजनेअंतर्गत मिळालेल्या ५३ कोटींच्या निधीतून आठ युनिट स्थापन करण्याचे ठरवले आहे. यातील दोन सुरूही झाले आहेत. नागपूर, पुणे, मुंबईतील युनिट उद्या २२ ऑक्टोबरला सुरू होईल. तर अमरावती, औरंगाबाद, नाशिकचे युनिट लवकरच  सुरू केले जाईल.

शुक्रवारी आभासी पद्धतीने होणाऱ्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार  उपस्थित राहतील. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील नागपूरहून प्रत्यक्ष हजर राहतील. या कार्यक्रमात या प्रकल्पासह राज्यातील पहिल्या वन्यजीव डीएनए तपासणी प्रयोगशाळेचेही उद्घाटन होईल, असेही त्यांनी सांगितले.

३३७ पदांची भरती

वर्ग एक ते चापर्यंतच्या संवर्गात ३३७ पदे भरण्याची परवानगी  शासनाला मागण्यात आली आहे. आता मान्यता मिळाल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ती भरतीबाबातची प्रक्रिया सुरू आहे.  काही पदे बाह्य़स्त्रोताकडूनही घेण्याचा विचार असून त्यासाठी शासनाची मंजुरी मागण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही संदीप बिश्नोई म्हणाले. सध्या न्याय सहाय्यक वैद्यकीय प्रयोगशाळेत कमी मनुष्यबळाची समस्या असल्याचेही त्यांनी मान्य केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 8 separate investigation units for child sexual offenses set up in maharastra zws

ताज्या बातम्या