अकोला : राज्यातील नागरिकांसाठी १०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व ‘बोट’ रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत १०८ सेवेद्वारे ९३७ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत असून त्यात आणखी ८१९ रुग्णवाहिकांची वाढ केली जाणार आहे. १७५६ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात सेवा देणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या १० वर्षात राज्यातील असंख्य रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेचा लाभ झाला. अनेक नवजात बालकांचा जन्म देखील रुग्णवाहिकेत झाला. समुद्र, व नद्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता नव्याने ३६ ‘बोट’ रुग्णवाहिका विविध अपघाती समुद्र किनारे व नदी पात्रांमध्ये तैनात होणार आहेत. त्याचबरोबर नवजात शिशूंसाठी २५ रुग्णवाहिका नव्याने येणार आहेत. दहा वर्षांपूर्वी १०८ रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. त्याचा सर्व भांडवली खर्च शासनाच्यावतीने करण्यात आला होता. नवीन निविदेनुसार ५१ टक्के भांडवली खर्च सेवा पुरवठा करणाऱ्या संस्थेला करावा लागेल. त्यामुळे सदर निविदा १० वर्षांसाठी काढण्यात आली आहे. रुग्णवाहिकांसाठी सद्यस्थितीत प्रतिमहिना ३३ कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागतात. रुग्णवाहिकेच्या वाढत्या संख्येमुळे प्रती महिना ६३ कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागतील. एकंदरीतच अतिरिक्त ३० कोटी प्रती महिना शासनाला खर्च करावा लागणार आहे. रुग्णवाहिकेची संख्या वाढल्याने १०८ क्रमांकावर संपर्क साधल्यावर रुग्णवाहिकेचा प्रतिसाद देण्याची वेळ कमी होईल.

हेही वाचा – दोन कोटीच्या सोने तस्करीचा बांगलादेश आणि मुंबईशी काय संबंध? वाचा…

हेही वाचा – भाजपच्या निकटवर्तीयाला दिले २४ कोटींचे कंत्राट; कोण आहे ही व्यक्ती? माहितीच्या अधिकारातून तपशील समोर

अशी आहे रुग्णवाहिकांची संख्या

सध्या १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेमध्ये २३३ ‘ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट’, ७०४ ‘बेसिक लाईफ सपोर्ट’, ३३ दुचाकी रुग्णवाहिका कार्यरत आहेत. नव्यामध्ये २२ ‘ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट’, ५७० ‘बेसिक लाईफ सपोर्ट’, दुचाकी रुग्णवाहिका १६३, २५ नवजात शिशुंसाठी रुग्णवाहिका आणि ३६ ‘बोट’ रुग्णवाहिका वाढणार आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 819 ambulances numbered 108 will be increased in the state now boat and neonatal ambulance services ppd 88 ssb
First published on: 24-01-2024 at 13:30 IST