नागपूर : वेतनवाढ हा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात नुकतीच बैठक मुंबईत पार पडली. बैठकीला कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकांमध्ये फिटमेंट फॅक्टर, मूळ वेतन, महागाई भत्ता यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर सुधारणा करण्याच्या मागण्या मांडण्यात आल्या. तर केंद्र व राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवय एक समान करण्याचीही मागणी कर्मचाऱ्यांची आहे.
एका वर्षाच्या आत सुधारित वेतन आयोग लागू करण्यासाठी शासनाने स्वतंत्र समिती स्थापन करावी
कर्मचाऱ्यांची वाढती महागाई, बदलती आर्थिक परिस्थिती, निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन आणि विविध शहरांतील राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन आठव्या वेतन आयोगाने खालील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करावा, अशी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सोहन चवरे यांनी मागणी केली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांचे किमान वेतन तिप्पट करण्यात यावे, केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय समान करावे म्हणजेच ६० करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनाही एका वर्षाच्या आत सुधारित वेतन आयोग लागू करण्यासाठी शासनाने स्वतंत्र समिती स्थापन करावी. समितीने कालमर्यादेत शिफारशी सादर करून त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशी मागणी चवरे यांनी केली.
डीए बेसिक सॅलरीमध्ये मर्ज होणार का?
महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांच्या वेतनात योग्य सुधारणा व्हावी, यासाठी काही कर्मचारी संघटनांनी महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. सातवा वेतन आयोगात डीए मोजण्याची विद्यमान पद्धत कायम ठेवण्याची शिफारस करण्यात आली. ही पद्धत प्रभावी असल्याचं आयोगाचे मत होते.
शिफारशींची वेळेत अंमलबजावणी व्हावी
वाढलेली महागाई, मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च, वाढता वैद्यकीय खर्च, दैनंदिन प्रवासाचा खर्च आणि शासकीय निवासस्थानांच्या अनुपलब्धतेमुळे खासगी घरभाड्याचा वाढता बोजा यामुळे कर्मचाऱ्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांच्या आर्थिक सुरक्षिततेचा आणि सन्मानजनक जीवनमानाचा विचार करून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची वेळेत अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागपूर जिल्हा तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र शिदोळकर यांनी केली.
लिपीक वर्गियांच्या वेतनश्रेणी सुधारित करावी
लिपीक वर्गीय संवर्गाला चौथ्या वेतन आयोगापासून निकृष्ट वेतनश्रेणी देऊन सातत्याने अन्याय करण्यात आला आहे याबाबत संघटनेने अभ्यासपूर्ण तपशील शासनाकडे देऊन लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी सुधारित करण्याची मागणी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची आहे. घरभाडे भत्त्याचा दर हा सुधारित करावा महागाई ही प्रचंड वाढत असताना घरभाडे भक्ता मात्र जुन्याच दराने मिळतो तो सद्यस्थितीत पुरेसा नाही. आठवा वेतन लागू करताना फिटमेंट फॅक्टर २.५७ पेक्षा जास्त असावा त्यापेक्षा कमी मंजूर झाला तर नवीन वेतन आयोगापासून काहीच पदरात पडले नाही, असे मत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष अरविंद अंतुरकर यांनी व्यक्त केले. तर केंद्राप्रमाणेच राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय करावे व वेतनश्रेणीत वाढ करण्याची मागणी विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गर्जे यांनी केली.
आयोगाची भूमिका काय?
वेतन आयोगासोबत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. काही मागण्यावर आयोग सकारात्मक असून काहींवर मतभेद असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता आयोग यावर काय भूमिका घेते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
