scorecardresearch

संमेलनाच्या मांडवातून.. नाथांचा नंदादीप!

‘‘दीप प्रज्वलन करताना हवेमुळे समईच्या थरथरत्या ज्योती विझतात की काय, अशी भीती होती.

96 akhil bharatiya marathi sahitya sammelan
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

शफी पठाण

संमेलनाच्या मांडवातले असंख्य लोचन आपल्या ज्योतींनी मंचावरचा नंदादीप न्याहाळताहेत हे ज्यांच्या नावातच ‘दीपक’ आहे त्या केसरकरांनी नेमके हेरले. या मंद तेजाळणाऱ्या दीपाच्या दिव्य प्रकाशी आपल्याला कुणाची ‘मूर्ती’ उजळायची आहे, हे त्यांनी मनोमन ठरवूनही टाकले आणि जेव्हा प्रत्यक्ष भाषणासाठी साद घातली गेली तेव्हा त्यांनी मनातील नंदादीपाच्या वाती शब्दांच्या नीरांजनात अलगद बसवल्या. इतक्या अलगद की, त्या जणू ‘शुभं करोति’च वाटायला लागल्या. ते म्हणाले, ‘‘दीप प्रज्वलन करताना हवेमुळे समईच्या थरथरत्या ज्योती विझतात की काय, अशी भीती होती. परंतु, आपल्या मुख्यमंत्र्यांनी लगेच हाताचा आडोसा दिला आणि वरचढ होऊ पाहणाऱ्या खटय़ाळ वाऱ्यावर मात करीत वाती पुन्हा नव्या जोमाने पेटू लागल्या. हे झाले मंचावरच्या ज्योतीचे. साहित्याच्या ज्योतीचेही असेच आहे.

ती अखंड तेवत राहावी, यासाठी शासन नेहमीच असा हाताचा आडोसा धरीत असते.’’ केसरकरांच्या या वाक्यावर टाळय़ा वाजायला लागल्या तसा मुख्यमंत्र्यांच्याही चेहऱ्यावर ‘ज्वाला ना काजळी दिवस ना राती.. सदोदित प्रकाश भक्तीनें प्राप्ती..’ असे काहीसे आनंददायी भाव दिसायला लागले. गुरुमूर्तीचे हे कौतुकभाव डोळय़ात साठवण्यासाठी केसरकरांचेही प्राण जणू लोचनाशी आले होते. अखेर दोघांची ‘भक्तिभिजली’ नजरानजर झाली. व्यासपीठ संमेलनाचे असो, की राजकारणाचे, एकनाथाचा नंदादीप म्हणून मी चोख भूमिका बजावतोय ना, असा एक प्रश्नार्थक भाव केसरकरांच्या नजरेत होता. तो त्यांच्या एकनाथांनी अर्थात मुख्यमंत्र्यांनी अचूक हेरला आणि एका मंद हास्यासह जणू समर्थाच्याच भाषेत ‘स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसी रे निववावे ।’ असाच समाधानी प्रतिसाद दिला. आपल्या नजरेतला हा रोचक संवाद कुणालाच कळणार नाही आणि आपल्या ‘जनकल्याणकारी’ सरकारी प्रसिद्धीचे धोरण संमेलनाच्या मांडवातही बेमालूमपणे राबवता येईल, असे दोघांनाही वाटत असावे. पण, केसरकर ज्या नंदादीपाच्या पाठराखणीचे श्रेय मुख्यमंत्र्यांना देत होते तो नंदादीप गुणीजनांच्या घोळक्यात तेवत होता आणि सभोवतालचे जण असे ‘गुणी’ असले की त्यांच्यापासून काहीच लपत नाही..ते लपवताच येत नाही. हे कदाचित त्यांना ठाऊक नसावे..

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 04:40 IST
ताज्या बातम्या