सोमवारी सकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास चिमूर तालुक्यातील शंकरपूर – भिसी मार्गांवर आंबोली गावापासून एक किमी अंतरावर नहरात वाळूने भरलेल्या १२ चाकी हायवाचा भीषण अपघात झाला. पुलावरून गाडी नाल्यात कोसळली. त्यात चालक व मदतनिसाचा जागीच मृत्यू झाला. मृतकांमध्ये वाहन चालक दीपक इंद्रा दीप (३०) व मदतनीस प्रताप शिवकुमार राऊत (२८) यांचा समावेश आहे. दोघेही मृतक नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सुरगाव येथील रहिवासी आहेत. हेही वाचा >>>विखे पाटील यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले, “सत्तेसाठी हिंदुत्वाशी फारकत घेणाऱ्यांनी..” पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मृतकांच्या शवांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून प्रक्रिया पूर्ण होताच नातेवाईकांकडे मृतकांचे शव सोपविण्यात येतील. चालकाला झोपेची डुलकी आल्यामुळे त्याचे गाडीवरून नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघात स्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. भिसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरपूर पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक चांदे पुढील तपास करीत आहेत.