गडचिरोली : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर विभागात नक्षलवादाच्या मुळावर घाव घालण्यात सुरक्षा दलांना मोठे यश आले आहे. दंतेवाडा जिल्ह्यातील ‘लोन वर्राटू’ (घरी परत या) या अभियानामुळे प्रभावित होऊन शुक्रवारी तब्बल ६३ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आपली शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. यात १८ महिला सदस्यांचा समावेश असून सर्वांवर मिळून एक कोटींहून अधिक बक्षीस होते. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने झालेल्या आत्मसमर्पणामुळे नक्षलवादी चळवळीला मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे.
दंतेवाडा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा आत्मसमर्पण सोहळा पार पडला. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये अनेक जण हे जहाल नक्षलवादी असून, त्यांच्यावर शासनाकडून लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने जहाल दलम सदस्य, जनमिलिशिया कमांडर आणि गावागावांत नक्षली विचारसरणीचा प्रसार करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांचा समावेश आहे. याप्रसंगी पोलीस उपमहानिरीक्षक (ऑपरेशन्स) सीआरपीएफ दंतेवाडा रेंजचे राकेश चौधरी, दंतेवाडा पोलीस अधीक्षक गौरव राय, सीआरपीएफच्या १११ व्या, १९५ व्या आणि २३० व्या बटालियनचे कमांडंट, अप्पर पोलीस अधीक्षक रामकुमार बर्मन आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
‘लोन वर्राटू’ अभियानाचा प्रभाव
स्थानिक गोंडी भाषेत ‘लोन वर्राटू’ म्हणजे ‘घरी परत या’. नक्षलवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून सन्मानाने जगण्याची संधी देण्यासाठी दंतेवाडा पोलिसांनी हे विशेष अभियान राबवले आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत शेकडो नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, गावोगावी नक्षलवाद्यांच्या नावे फलक लावून त्यांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले जात आहे. नक्षल विचारसरणीची पोकळी आणि सुरक्षा दलांचा वाढता दबाव यामुळे नक्षलवाद्यांचे मनोबल खचले आहे, असे मत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षली संघटनेत होत असलेले शोषण, वरिष्ठ नेत्यांची भेदभावपूर्ण वागणूक आणि विकासापासून वंचित राहिल्याची भावना यामुळे त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या पुनर्वसन धोरणामुळे आपल्याला नव्याने आयुष्य सुरू करण्याची आशा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्व ६३ माजी नक्षलवाद्यांना तात्काळ सानुग्रह अनुदान देण्यात आले असून, शासनाच्या धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यांना स्वतःचे घर, शेतीसाठी जमीन किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून ते पुन्हा हिंसक मार्गाकडे वळणार नाहीत.
नक्षलवादाचा गड मानल्या जाणाऱ्या दंतेवाड्यात मिळालेले हे यश आगामी काळात या भागातील शांतता आणि विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
