नागपूर: बहिणीने मोबाईल देण्यास नकार दिल्यावरून एका ११ वर्षीय मुलाने राहते घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत डिगडोह परिसरात घडली. या घटनेवरून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हंसराज कृष्णकांत राय (रा. पोलिसनगर) असे मृताचे नाव आहे.
हंसराज पाचवीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील कृष्णकांत मध्यप्रदेशात नोकरी करतात. आई शीला ही हंसराज आणि दोन मुलींसह तिचे वडील छोटेलाल राय यांच्याकडे राहते. हंसराज घरात सर्वात लहान होता. यामुळे सर्वजण त्याचा लाड करीत होते. रविवारी सायंकाळी आजोबा छोटेलाल एका कार्यक्रमाला गेले होते. आई शीला लहान मुलीसह कामाने बाहेर गेली होती. हंसराज परिसरातच खेळत होता, तर मोठी बहीण घरी अभ्यास करीत होती. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हंसराज खेळून घरी परतला. त्याने गेम खेळण्यासाठी बहिणीकडे मोबाईल फोन मागीतला. तिने फोन देण्यास नकार दिला. यामुळे रागात येऊन हंसराज आतल्या खोलीत गेला.
हेही वाचा… नागपूर: तरुणाची तलावात उडी घेऊन आत्महत्या
बहिणीला वाटले की, काही वेळाने त्याचा राग शांत होईल आणि तो बाहेर येईल. मात्र हंसराजने रागात छताच्या पंख्याला दुपट्टा बांधून गळफास लावला. बराच वेळ होऊनही हंसराज बाहेर न निघाल्यामुळे बहीण खोलीत गेली असता हंसराज गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. तिने आरडा-ओरड करून शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. नागरिक गोळा झाले आणि घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. एमआयडीसी पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. पोलिसांनी हंसराजचे आजोबा छोटेलाल यांच्या सूचनेवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. इतक्या लहान वयाच्या मुलाने आत्महत्या केल्यामुळे पोलिसांना धक्का बसला आहे.