नागपूर : प्रेयसीचे एका युवकासोबत लग्न जुळले. तिने प्रियकराकडे पैशासाठी तगादा लावला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. प्रियकराने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे प्रेयसीने त्याचा गुप्तांग ठेचून खून केला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी प्रेयसी काजोल (२७, रा. साईनगर) हिच्याविरुद्ध हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. रवींद्र (५५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

रवींद्र हा बिल्डर होता. महिन्याकाठी लाखो रुपयांचा व्यवहार तो करीत होता. एका विधवा महिलेने त्याच्याशी अनैतिक संबध ठेवले. त्याच्याकडील पैसे उकळून घर बांधले. मुलगी काजोल हिचे शिक्षण आणि व्यवसायासाठी त्याच्याकडून आर्थिक मदत घेतली. अशातच महिलेच्या २७ वर्षीय मुलीची रवींद्रवर नजर पडली. तिने आईशी संगनमत करून रवींद्रला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आई आणि काजोल या दोघींवरही तो प्रेम करीत होता. मायलेकीने त्याच्याकडून लाखो रुपये उकळले. यादरम्यान काजोलने एका युवकाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रवींद्रचा या लग्नास विरोध होता. मात्र, काजोलने काही दिवसांपूर्वीच साखरपुडा उरकून टाकला. नाईलाजाने रवींद्रने लग्नास होकार दर्शविला. १९ एप्रिलला काजोलने रवींद्रला घरी बोलावले. लग्नाच्या खर्चासाठी तिने रवींद्रवर दबाव टाकला. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे काजोलने रवींद्रचा गुप्तांग ठेचून खून केला.या हत्याकांडात तिच्या आईनेही तिला साथ दिल्याची चर्चा आहे. त्यानंतर रात्रीच्या सुमारास रवींद्रचा मृतदेह चौकात फेकून देण्यात आला. या प्रकरणी काजोलवर हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा >>>Video : ‘छोटा मटका’च्या वारसदाराने शिकार ठेवली लपवून, संधी मिळताच मारला ताव…

पोलिसांचा हत्याकांड दडपण्याचा प्रयत्न?

हुडकेश्वर पोलिसांनी रवींद्रचा खून झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना दिली. हुडकेश्वर पोलिसांनी रवींद्रचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे त्यांना सांगितले. ठाणेदाराने हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. सहायक निरीक्षक पंकज चक्रे यांनीही काजोलने एकटीनेच खून करून मृतदेह फेकल्याचा दावा केला आहे. अद्यापही रवींद्रच्या हत्येप्रकरणात पोलिसांची लपवाछपवी सुरू असल्याची चर्चा आहे.