Premium

अश्लील हावभावांवर रोष, नागपुरात गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल होणार

एकता गणेशोत्सव मंडळाने नृत्यांगना गौतमी पाटील हिचा लावणीचा कार्यक्रम आयोजित केला आणि तुफान गर्दी उसळल्याने खुर्च्यांची तोडफोड झाली. त्यामुळे गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

Gautami Patil
गौतमी पाटील (संग्रहित फोटो)

नागपूर : गेल्या काही वर्षांपासून नागपुरातील एकता गणेशोत्सव मंडळ आणि वाद याचे समीकरण कायमच आहे. यावर्षीसुद्धा एकता गणेशोत्सव मंडळाने नृत्यांगना गौतमी पाटील हिचा लावणीचा कार्यक्रम आयोजित केला आणि तुफान गर्दी उसळल्याने खुर्च्यांची तोडफोड झाली. त्यामुळे गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा मंडळाचे नाव चर्चेत आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात एकता गणेशोत्सव मंडळाच्यावतीने हिलटॉप परिसरात गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, लहान मैदानावर लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण वाढला. तसेच गौतमीच्या लावणीला यावेळी पहिल्यांदाच महिलांची गर्दी उसळली. व्हीआयपी खुर्च्यांच्या मागेच पोलिसांनी बॅरिकेड्स लावल्यामुळे अनेक दर्शकांनी खुर्च्यांवर ऊभे राहून लावणी बघायला सुरुवात केली. काहींनी खुर्च्यांची तोडफोड करून गोंधळ घातला. गर्दीमुळे चेंगराचेंगरीची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांना काही युवकांवर सौम्य लाठीमार करावा लागला. या प्रकारामुळे कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ उडाला. गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट हात वर करून पोलिसांकडे बोट दाखवले. या कार्यक्रमात लहान मुले आणि महिला होत्या, त्यामुळे अनेक महिला पोलिसांना महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना सुरक्षा घेराव घालावा लागला. मात्र, मंडळाने कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिला.

हेही वाचा – सुप्रिया सुळे तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर, उद्दिष्ट काय? जाणून घ्या…

गौतमीवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

गौतमी पाटील हिने मंचावरून दर्शकांकडे बघून अश्लील हातवारे आणि इशारे केले. या कार्यक्रमात महिला-तरुणीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. त्यामुळे काही एनजीओमधील महिलांनी या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची तयारी केल्याची माहिती आहे.

हेही वाचा – मान्सूनचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला! देशाच्या काही राज्यांमधून परतीची वाट…

गजभियेंकडून प्रतिसाद नाही

एकता गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ उडाल्याने झालेल्या पोलिसांच्या लाठीमारामुळे सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे. या बाबतीत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माजी आमदार प्रकाश गजभिये यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A case will be registered against gautami patil in nagpur adk 83 ssb

First published on: 30-09-2023 at 17:56 IST
Next Story
मान्सूनचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला! देशाच्या काही राज्यांमधून परतीची वाट…