अकोला : हरवलेल्या मूकबधिर मुलाला पुन्हा आपल्या कुटुंबीयांकडे जाण्यासाठी नोंदणी प्रक्रियेचाच ‘आधार’ मिळाला आहे. उत्तरप्रदेशमधील मूकबधिर मुलगा हरवल्यानंतर बाळापूर येथे पोलिसांना सापडला होता. त्याच्या कुटुंबाचा पत्ता लावण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते. आधार नोंदणीची प्रक्रिया करून त्या मुलाच्या जुन्या आधार कार्डवरून कुटुंबीयांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर मूकबधिर मुलाला कुटुंबाच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

उत्तरप्रदेशातून हरवलेला एक मूकबधिर मुलगा दोन महिन्यांपूर्वी बाळापूर पोलिसांना सापडला होता. साधारणत: १८ वर्ष त्या मुलाचे वय. मात्र, मूकबधिर असल्याने संवादाची मोठी अडचण निर्माण झाली. त्याला बालकल्याण समितीकडे सादर केले. समितीच्या आदेशाने त्या बालकास शासकीय बालगृह येथे दाखल करण्यात आले. त्याचा मूळ पत्ता शोधण्यासाठी मूकबधिर शाळेच्या शिक्षिकेची मदत घेण्यात आली. मात्र, त्या प्रयत्नांचा उपयोग झाला नाही. त्याला केवळ स्वत:चे नाव लिहिता येत होते. त्यावरून त्याचे नाव सतिश असल्याची माहिती मिळाली. शिक्षक संजय मोटे यांनी त्याला विविध रेल्वेस्थानकांचे छायाचित्र दाखवले, तोही प्रयत्न निष्फळ ठरला.

हेही वाचा – ‘पदपथावरून चालण्याच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण व्हावे’

त्याला आधारकार्ड दाखविण्यात आल्यावर त्याने होकारार्थी मान हालवली. त्यानंतर शोधप्रक्रियेला वेग मिळाला. त्याच्या आधार कार्डची नोंदणी प्रक्रिया करण्यात आली. अगोदरच आधारकार्ड असल्याने नोंदणी होऊ शकत नाही. पूर्वीचा नामांकन क्रमांक मिळवण्यात आला. आधार क्रमांक मिळताच सतिशला पुन्हा केंद्रावर नेण्यात आले. आधार क्रमांक व त्याच्या बोटांचे ठसे घेऊन पूर्वीचे आधारकार्ड प्राप्त करण्यात आले. त्यानंतर तो उत्तरप्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील असल्याचे कळले. त्यावेळी तातडीने त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला.

आपला मुलगा सुखरूप असल्याचे कळताच कुटुंबीय भारावून गेले. तत्काळ त्याचे नातेवाईक रवींद्र पाल हे आज अकोल्यात दाखल झाले. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत त्याला त्यांच्या सुपुर्द करण्यात आले. मूकबधिर मुलगा आपल्या नातेवाईकाकडे आपल्या गावाकडे रवाना झाला आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हरवलेला मूकबधिर मुलगा पुन्हा आपल्या कुटुंबाकडे परत जाऊ शकला आहे.

हेही वाचा – ताडोबात बुद्ध पौर्णिमेला ‘निसर्ग अनुभव’; १७८ निसर्गप्रेमींचा ८९ मचणांवर मुक्काम!

आधारकार्डवरून आतापर्यंत चार बालकांचा शोध

अकोला येथील समिती व महिला बालविकास विभागाकडून आधारकार्ड प्रक्रियेची मदत घेऊन आतापर्यंत या पद्धतीने चार बालकांचा शोध लावण्यात आला. ही बाब इतर जिल्ह्यातील प्रशासनालाही प्रेरणादायी ठरत आहे.