दारूड्या मुलाने वडिलांची सत्तुरने वार करून हत्या केली. ही धक्कादायक घटना होळीच्या दिवशी वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्की येथे घडली. घटनेनंतर काही तासांतच आरोपीस अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला शुक्रवार, १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
हेही वाचा >>>नागपूर : होळी-धुळवडीला ५ हजारजणांवर कारवाई
सुरेश नामदेवराव देशमुख (७५) रा. मार्की असे मृत वडील तर गोपाळ सुरेश देशमुख (४०) रा. मार्की असे आरोपी मुलाचे नाव आहे. सोमवारी गोपाळ हा मद्यधुंद अवस्थेत गावातील चौकात जोरजोरात आरडाओरड करून शिवीगाळ करीत होता. त्यामुळे वडील सुरेश हे त्याला समजावयला गेले. तू नेहमी भांडण करतो, तुझ्यामुळे गावात आमची इज्जत गेली, असे ते मुलगा गोपाळला म्हणाले. त्यावर म्हाताऱ्या तुला बघून घेतो, असे म्हणून गोपाळ तेथून निघून गेला. त्यानंतर काही वेळाने गोपाळ हा घरी गेला. यावेळी वडील सुरेश हे लहान मुलगा अमोल (३५) याच्यासोबत घरी होते. घरात शिरताच माझ्यामुळे तुझी इज्जत गेली का, असे म्हणून गोपाळने वडील सुरेश यांच्यावर सत्तुरने हल्ला चढविला. त्यात सुरेश यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा >>>भंडारा: शेतकऱ्याला हरभऱ्याच्या शेतात निद्रावस्थेत वाघ दिसला, पुढे झाले असे की…
या घटनेनंतर मृत सुरेश यांचा लहान मुलगा अमोल यांनी वलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गोपाळविरुद्ध गुन्हा दाखल करून घटनेनंतर काही तासांतच त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला शुक्रवार, १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.