यवतमाळ : महागाव तालुक्यातील वागद इजारा परिसरात ज्वारी सोंगणीचे काम करणाऱ्या शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी दशरथ महादू वंजारे (५५) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर यवतमाळ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली आहे.

वागद इजारा स्व. सुधाकरराव नाईक जलाशयाच्या शेतशिवारात सध्या उन्हाळी पीक ज्वारी, तीळ, भुईमूग या पिकाच्या सोंगणीचा हंगामाची लगबग चालू आहे. असेच ज्वारी सोंगणीचे काम वागद इजारा येथील शेतकरी दशरथ महादू वंजारे आपल्या शेतात हंगामाचे काम करत असताना वंजारे यांच्यावर ज्वारीतून अचानक रानडुकरांनी हल्ला चढविला. आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे शेतकरी मदतीला धावून आले. त्यामुळे रानडुकराने पळ काढला. दरम्यान या हल्ल्यामध्ये शेतकरी दशरथ वंजारे गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्या कंबरेझाली खोलवर जखम झाली. त्यांची  प्रकृती गंभीर आहे. जखमी शेतकऱ्यास उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>अकोल्यात अवैध सावकारीविरोधात धाडसत्र…. तीन ठिकाणांवरून आक्षेपार्ह…

सध्या रखरखत्या उन्हात पाण्यासाठी व्याकुळ झालेले वन्यप्राणी आपली तहान भागविण्यासाठी धरण आणि मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत.  गेल्या आठवड्यात गौतम शामराव रणवीर (काळी दौलत खान) हे बोरीला कामानिमित्त जात असताना त्यांना वागद पासून पाचशे मीटरच्या अंतरावर असलेल्या नाल्यात काशीराम जाधव यांच्या ज्वारीच्या शेतात बिबट्या व त्याचा बछडा दिसला होता. याबाबत वनविभागाचे काळी दौ. वनपरिक्षेत्राधिकारी सम्राट मेश्राम यांना निवेदन देवून या वन्यजीवांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे. जंगलातील पाणवठ्यामध्ये पाणी उपलब्ध नसल्यामुळे वन्यजीव पाणी व अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. आज झालेल्या रानडुकराच्या हल्ल्याबाबत वन विभागाला नागरिकांनी अवगत केले. वनपरिक्षेत्र अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. काळी दौलत खान वनपरिक्षेत्रात पाणी नसल्याने वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. काळी दौलत खान परिसरातील रानडुकराच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. वेळीच या संदर्भात दखल न घेतल्यास गेल्यास पुढील जंगली जनावरांची हल्ले वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.