बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील औद्योगिक, व्यवसाय नगरी म्हणून प्रसिद्ध खामगाव शहराचा परिसर म्हणजे वाहन अपघातासाठी (कु)प्रसिद्ध!
जवळून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, त्यात पडलेली व पडणारी महामार्गाची भर, चोवीस तास सुरू असणारी प्रवासी व मालवाहतूक यामुळे लहान मोठे अपघात नेहमीचीच बाब ठरली आहे. मागील एप्रिल महिन्यात खामगाव नाजिकच्या विविध अपघातात अनेक जणांचा बळी गेला, अनेक जायबंदी झाले.

अपघातांची मालिका कायम असतानाच खामगाव परिसरात आज मंगळवारी, ६ मे रोजी सकाळी आणखी एका वाहन अपघाताची घटना घडली. मात्र हा अपघात नेहमीपेक्षा आगळावेगळा होता. अपघात भीषण असला तरी सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यात ‘माणुसकीचा देखील अपघात झालाय’!

खामगाव मेहकर राज्य मार्गावरील गोमेधर फाट्यावर हा अजब अपघात आणि त्यानंतर माणुसकीला लाजविणारा दुर्देवी घटनाक्रम घडला.

काय झाले बरं?

डिझेल भरलेले इंधन वाहक वाहन (टँकर ) मुंबईहून पुढील प्रवासाला निघाले होते. दरम्यान भरवेगात असलेल्या या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे हे टँकर खामगाव मेहकर मार्गावरील गोमेधर फाट्यावर भरवेगात उलटले. इंधनाने भरलेले असल्याने हे जडवाहन भरधाव वेगात उलटल्याने मोठा आवाज झाला. परिसर हादरविणारा हा आवाज ऐकून परिसरातील गावकरी आणि काही येणारे जाणाऱ्या प्रवाशांनी दुर्घटनाग्रस्त टँकरच्या दिशेने धाव घेतली. जोरदार वेगात हे वाहन काही क्षणातच उलटल्याने वाहन चालक आणि वाहक हे जागीच ठार वा गंभीर जखमी झाले असावे , असा भितियुक्त अंदाज दर्शवून गावकरी टँकरच्या चालक कक्षाकडे ( केबिनकडे) पोहोचले. मात्र सुदैवाने चालक आणि वाहक हे दोघेही सुखरूप असल्याचे आढळून आले. गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढल्यावर चालक, वाहक जखमी असल्याचे दिसून आले. मात्र त्यांचे प्राण वाचल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

…अन् माणुसकीचाही अपघात!

दरम्यान तोपावेतो माणुसकी दाखविणाऱ्या गावकऱ्यांना नंतर मात्र माणुसकीचा विसर पडला. एवढेच काय माणुसकी हरविल्याचे दुर्देवी चित्र तयार झाले. या अपघाताची माहिती कळतच गावकरी शेकडोच्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. मात्र ते वेगळ्याच उद्देशाने तिथे आले होते. कारण मिळेल ते वाहन घेऊन तिथे आलेल्या या प्रत्येकाच्या हातात प्लास्टिकच्या कॅन,छोटे ड्रम, इतर भांडे होते. लहान मुलांसह तरुण, वृद्धदेखील शेकडोच्या संख्येने आले आणि टँकरमधील हजारो लिटर डिझेलवर अक्षरशः तुटून पडले! त्यातील डिझेल भरून घेण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. डिझेल भरताना नागरिकांमध्ये बरेचदा वाद, गलिच्छ शिवीगाळ आणि धक्काबुक्कीही झाल्याच पाहायला मिळाल.

काही मिनिटांपूर्वी आपली सुटका करणाऱ्या मोजक्या ग्रामस्थांचे टँकर चालक आणि वाहक पुन्हापुन्हा आभार मानत होते. आता तेच चालक आणि वाहक हातपाय पडून आणि जोडून डिझेल लूटमार करणाऱ्यांना विनवण्या करीत होते, डिझेल नका नेऊ, असे सांगत होते. मात्र फुकटच्या डिझेलच्या लोभापायी त्यांचं कुणीच ऐकायला तयार नव्हते. यामुळे माणुसकी हरली आणि लोभ, मत्सर, हेवा या दुर्गुनांचा विजय झाला, असे चित्र निर्माण झाले. पोलीस येईपर्यंत टँकरमधील संपूर्ण डिझेल नागरिकांनी चोरून नेत राजरोस लूटमार केली.