महिनाभरापूर्वी स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोवीस लाख रुपये लंपास करणाऱ्या टोळीस तेलंगणात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींना बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी सर्वप्रथम हरयाणा आणि नंतर तेलंगणात कारवाई केली. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा अटकेचा थरार चकित करणाराच ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>उरणमध्ये खेळ, खेळाडूंचा सामाजिक जागर; तरुणांमध्ये खेळाविषयी जनजागृकता वाढवण्यासाठी उपक्रम

२९ ऑगस्टला वर्धेलगत बोरगाव व पुढे वायगाव येथील बँकेचे एटीएम कटरने फोडून चोरट्यांनी २३ लाख ७८ हजार रुपयांची रक्कम शिताफीने लंपास केली होती. या घटनेने पोलिसांची झोप उडाली. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी तत्परतेने तपास चमू गठीत करीत चोरट्यांना जेरबंद करण्याचे आदेश दिले. रक्कम लंपास करण्यासाठी आरोपींनी हिंगणघाट येथील गाडी चोरली होती. तांत्रिक माहितीच्या आधारे चोरटे हे हरयाणातील मेवातचे असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस त्यागावी धडकले. तेथून प्राप्त माहिती आधारे आरोपी तेलंगाणा येथील निझामाबदला असल्याचे कळून आले. पोलीस पथक त्या ठिकाणी शुक्रवारी पोहचले. विशेष म्हणजे, महामार्गावरील बांधकाम करणारे मजूर म्हणून पोलीस वावरले. रस्त्यावरील ढाब्याची रेकी केली. मेवात या त्यांच्या मूळ गावच्या नावे असणाऱ्या ढाब्यावर एक आरोपी बसला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मात्र दोन पकडल्या गेले तर दोन जंगलाच्या दिशेने पळू लागले. पाठलाग करून त्यांनाही पकडण्यात यश आल्याचे तपास अधिकारी महेंद्र इंगळे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> भंडारा : वगार खाऊन वाघाची वडस्याकडे कुच – पाऊलखुणा कॅमेऱ्यात कैद

साबीर खान, अन्सार खान, इरफान शेख व हकाम शेख अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून वाहनाची बनावट नंबर प्लेट, एक कार, विविध हत्यारे जप्त करण्यात आलीत. या टोळीने यापूर्वी राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरयाणा या राज्यात अशाप्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपींना जेरबंद करणाऱ्या पोलिसांच्या चमूत अमोल लगड, सलाम कुरेशी, हमीद शेख, गजानन लामसे, निरंजन वरभे, रणजित काकडे व अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोपींना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A gang that broke atms in villages near wardha was arrested in telangana amy
First published on: 24-09-2022 at 19:13 IST