बुलढाणा: एका वासनांध युवकाने एका विवाहित महिलेवर मानसिक दडपण आणून तिचे शारीरिक शोषण केले. वैवाहिक संबंध जपण्यासाठी हे शारीरिक अत्याचार झेलणाऱ्या हतबल महिलेने अखेर हे सर्व असह्य झाल्याने पोलिसांकडे धाव घेतली.
बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल आणि सीमावर्ती भागातील संग्रामपूर तालुक्यातील एका गावात हा धक्कादायक आणि तितकाच चीड आणणारा घटनाक्रम घडला आहे. एका २४ वर्षीय तरुणाने विवाहितेवर ७ ते ८ वेळा वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस ठाण्यात विवाहितेने तक्रार दिली आहे. आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा घडला घटनाक्रम
नीलेश प्रल्हाद भवर ( वय २४ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने तक्रारीत केलेल्या दाव्यानुसार, मागील २ जानेवारी २००५ रोजी विवाहिता अंघोळ करीत होती. या महिलेवर पहिल्यापासूनच वाईट नजर ठेवून असलेल्या आरोपी भवर याने आंघोळ करतानांचे तिचे फोटो तिला खबर न लागू देता काढले. मात्र काही वेळाने महिलेला संशय येताच त्याने तिथून पळ काढला. मात्र दुसऱ्या दिवशी आरोपी आपले खरे रूप दाखवीत विवाहितेच्या घरी गेला. त्याने आदल्या दिवशी काढलेले विवस्त्र अवस्थेतील फोटो विवाहितेला दाखवले. फोटो पाहून विवाहितेला प्रचंड मानसिक धक्का बसला. तिला काहीच सुचेनासे झाले. तिच्या द्विधा मानसिकतेचा गैरफायदा घेत आरोपीने विवाहितेकडे शारीरिक सुखाची मागणी केली. नकार दिल्यास ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
यामुळे वैवाहिक जीवन आणि नातेवाईक, गावात तसेच समाजात आपली अब्रू वाचविण्यासाठी तिने नाईलाजाने यास होकार दिला. यानंतर मागील सहा महिन्याच्या काळात वेळोवेळी आरोपीने या महिलेवर अत्याचार केले. मात्र हा सर्व प्रकार असह्य झाल्याने विवाहित महिलेने पोलिसांकडे धाव घेत आपली आपबीती सांगितली. या घृणास्पद घटनेचा तपास तामगाव पोलीस करीत आहे.