बाजार समितीतील शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाने केलेल्या हल्ल्याचे पडसाद आज जिल्ह्यात उमटले. सिंदखेडराजामध्ये आज धडक निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच अन्य १२ तालुकास्थळीदेखील या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेधाचे निवेदन तहसीलदारांच्या माध्यमाने राज्यपालांना पाठविले.

हेही वाचा >>> नागपूर : संसदेत वकिलांचे प्रतिनिधित्व हवे ; सरन्यायाधीश उदय लळित

३ सप्टेंबरला बुलढाण्यात पार पडलेल्या शिवसेनेच्या सत्कार समारंभात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक करीत शिवसेना पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण केली होती. याचे पडसाद जिल्ह्यात उमटले. शिवसेनेची ताकद असणाऱ्या सिंदखेडराजामध्ये आज (५ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता निषेध मोर्चा काढण्यात आला. ऐतिहासिक नगरीतील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मोर्चाअंती तहसीलदार यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले. ज्येष्ठ नेते छगनराव मेहेत्रे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात योगेश म्हस्के, संदीप मेहेत्रे, विष्णू ठाकरे, अशोक मेहेत्रे, बबन मेहेत्रे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हल्लेखोरांना अटक करा, माळी समाजाबद्दल अपमानास्पद शब्द वापरणाऱ्याविरुद्ध कारवाई करा, बुलढाणा ठाणेदाराविरुद्ध कारवाई करा, आदी मागण्या करण्यात आल्या.