नागपूर : पीडिता सीताबर्डी परिसरात एका कपड्याच्या दुकानात कामाला आहे. ती रोज ऑटोने कामावर येणे-जाणे करीत होती. संकेत याच मार्गावर ऑटो चालवतो. या दरम्यान दोघांची ओळख झाली. संकेतने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. तिने लग्नासाठी दबाव टाकला. संकेतने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच याबाबत वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. पीडितेने कुटुंबीयांना याबाबत सांगितले. अजनी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि पोक्सो ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून संकेतला अटक केली. पीडितेची आर्थिक स्थिती हलाखिची आहे. त्यामुळे तिने शाळा सोडली. आईवडिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी ती सीताबर्डीत एका कपड्याच्या दुकानात कामाला जात होती. यादरम्यान संकेतने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केला.
लग्नाचे आमिष दाखवून ऑटोचालकाने एका अल्पवयीन पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण केले. ही घटना अजनी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. पोलिसांनी १७ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून आरोपी ऑटोचालकाला अटक केली. संकेत मेश्राम (२१) रा. अजनी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गर्भपात करण्यासाठी दबाव
दोघांचे गेल्या काही दिवसांपासून प्रेम संबंध होते. त्यांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण मुलीच्या कुटुंबियांनाही लागली होती. तो तिला फिरायला जाण्याच्या बहाण्याने शहराबाहेर नेऊन शारीरिक संबंध ठेवत होता. काही दिवसांपूर्वी मुलगी गर्भवती झाली. तिने संकेतला याबाबत माहिती दिली. संकेतला लग्न करायचे नव्हते म्हणून तो घाबरला. मुलीने समाजात बदनामी होण्यापूर्वी लग्न करण्यासाठी दबाव टाकला. मात्र, त्याने लग्न करण्यासाठी नकार देऊन गर्भपात करण्यास दबाव टाकला. मुलगी गर्भवती असल्याची बाब वस्तीत माहिती झाल्यामुळे वस्तीत तिची बदनामी झाल्यामुळे कुटुंब त्रस्त झाले आहे.
चोवीस तासांत अत्याचाराच्या दोन घटना
मागील २४ तासांपूर्वी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ८ वर्षीय पीडितेवर अज्ञात आरोपीने २० रुपये देण्याचे आमिष दाखवून बलात्कार केला. यावेळी पीडिता लहाण बहिणीसह घरासमोर खेळत होती. अज्ञात आरोपीने तिच्या वडिलाचा मित्र असल्याचे सांगून तिला घरात नेले. बहिणीला बाहेर थांबण्यास सांगितले. घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि पळून गेला. आतापर्यंत पोलिसांना आरोपी सापडलेला नाही. गेल्या २४ तासांत दोन घटना घडल्यामुळे गृहमंत्र्याच्या शहरातच महिला सुरक्षित नसल्याचा आरोप विरोधी पक्षांसह नागरिक करत आहेत.