अमरावती : जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही तरुणी व महिलांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.
अशीच एक विनयभंगाची घटना परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडित महिलेच्या पतीने हाकलल्यानंतरही एक विकृत व्यक्ती केवळ चड्डी आणि बनियन घालून महिलेच्या घरात शिरला. याप्रकरणी रात्री उशिरा आरोपीच्या विरोधात विनयभंग, मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उमेश रघुनाथ जवंजाळ (४४, रा. अंजनगाव सुर्जी, ह.मु. परतवाडा) असे आरोपीचे नाव आहे.




तक्रारीनुसार, शनिवारी रात्री पीडित महिला घरी एकटी असताना आरोपी उमेश जवंजाळ हा चड्डी बनियनवर फिर्यादी महिलेच्या खोलीकडे जात होता. तेवढ्यात फिर्यादी महिलेचे पती आले. त्यांनी ते पाहिले. मी घरी नसताना माझ्या घराकडे अशाप्रकारे का जात आहेस, असा जाब विचारत त्यांनी त्याला हाकलून दिले व ते हातपाय धुण्यासाठी बाथरूममध्ये गेले. त्यावेळी उमेश जवंजाळ हा फिर्यादी महिलेच्या खोलीत अर्धनग्न स्थितीत शिरला. त्यामुळे महिला जोरात ओरडली. त्यामुळे तिच्या पतीने बाथरूमबाहेर धाव घेत आरोपीला जाब विचारत पुन्हा हाकलले. त्यानंतर आरोपी हा महिलेच्या पतीच्या अंगावर मारण्यासाठी धावला आणि शिवीगाळ केली.