मोमीनपुरा परिसरात क्षुल्लक वादावरून एकाने गुरुवारी मध्यरात्री पिस्तुलातून हवेत गोळी झाडली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत.रवी लांजेवार (३८) रा. उमरेड रोड आणि आनंद ठाकूर (३५) मानेवाडा रोड असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. प्रणय आणि समीर हे दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच्या सुमारास मोमीनपुरा परिसरात एका चहा टपरीवर रवी लांजेवार आणि आनंद ठाकूर यांच्यासह चौघे कारने आले. दरम्यान त्यांच्या कारने शहाबुद्दीन रियाजुद्दीन उर्फ पापा याच्या दुचाकीला धडक दिली. त्यातून शहाबुद्दीन यांनी चालक आनंद ठाकूर याला मारहाण केली. यावेळी बघ्यांची गर्दी जमल्याने आरोपी पसार झाले.
हेही वाचा >>>वर्धा: नाद खुळा! युवा शेतकऱ्याने साकारले ‘फाईव्ह स्टार’ मचान
यानंतर चार आरोपींनी नंदनवन येथील एका बारमध्ये दारू पिली व ते पुन्हा मोमीनपुरात परतले. दारुच्या नशेत एकाने एक गोळी हवेत तर दुसरी पानठेलाचालक रईस अख्तरच्या दिशेने चालवली. मात्र, अति दारू सेवनाने नेम चुकल्याने रईस बचावला. हे बघताच, चौघेही कारमध्ये बसून पसार झाले. याची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रवी लांजेवार आणि आनंद ठाकूर यांना अटक केली. समीर आणि प्रणय हे दोघेही अद्याप फरार आहेत.