अकोला : स्वतःच्या छायाचित्राला श्रद्धांजली वाहून युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवण खुर्द शेत शिवारात उघडकीस आली.




मंगेश भाऊराव भगत (३२, रा. खरब ढोरे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चेतन नंदकिशोर सावरकर (२५, रा. शिवण खुर्द) मुलाबाळांसह राहत होता. तो शेती करीत होता. त्याने स्वतःच्या छायाचित्रावर श्रद्धांजली लिहिलेले स्टेटस मोबाईलवर ठेवून शिवण खुर्द शिवारात झाडाला गळफास घेतला आणि आपले जीवन संपवले. फिर्यादी मोबाईल पाहत असताना त्यांनी स्टेटस पाहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहे.