नागपूर : नागपूरजवळील कन्हान नदीवरील पुलावर एका भरधाव खासगी बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटोरिक्षाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कामठी लष्करी छावणीतील (कँटोन्मेंट बोर्ड) दोन जवानांचा मृत्यू झाला, तर सहा जवानांसह ऑटोरिक्षाचालक गंभीर जखमी झाला. जखमींवर मेयो, मेडिकलसह लष्करी छावणीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. जी. विघ्नेश (३०) आणि धीरज रॉय, अशी अपघातात ठार झालेल्या जवानांची नावे आहेत, तर कुमार पी., शेखर जाधव, पूमुरगन बी., अरविंद कुमार, डी. प्रधान, नागा रथीनम एम. अशी जखमी जवानांची नावे असून शंकर विठूलाल खरागबान हा ऑटोरिक्षाचालकही गंभीर जखमी आहे.

कामठी येथील लष्करी छावणीतील आठ जवान रविवारी सुट्टी असल्यामुळे लगतच्या कन्हान शहरात दैनंदिन वापराच्या वस्तूच्या खरेदीसाठी दोन ऑटोरिक्षाने गेेले होते. खरेदी आटोपल्यावर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ते ऑटोरिक्षाने (एमएच४९एआर ७४३३) परत येत होते. यादरम्यान जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान नदीच्या पुलावर भरधाव खासगी बसने (एमएच ३१ एफसी-४१५८) या ऑटोरिक्षांना धडक दिली. यात एका ऑटोरिक्षाचा चुराडा झाला. त्या ऑटोरिक्षातील कुमार पी., शेखर जाधव, पूमुरगन बी., अरविंद कुमार, डी. प्रधान, नागा रथीनम एम., धीरज रॉय आणि विघ्नेश जी. यांच्यासह चालक शंकर खरागबान हे गंभीर जखमी झाले. अपघात होताच कन्हान पोलीस आणि जुनी कामठी पोलीस लगेच घटनास्थळावर पोहचले.

हेही वाचा >>>नागपुरात ओबीसी संघटनांची बैठक, प्रकाश शेंडगे यांनी काय इशारा दिला

नागरिक आणि पोलिसांनी अपघातातील जखमींना मेयो, मेडिकलसह छावणी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान विघ्नेश जी. आणि धीरज रॉय यांचा मृत्यू झाला, तर उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून खासगी बसचा चालक मधुकर विठ्ठलराव काळे (६०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.