अमरावती : शेतात काम करीत असलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढविला. या हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी धारणी तालुक्यातील शिवाझिरी शिवारात घडली. वन व पोलीस विभागाच्या वतीने युद्धस्तरावर वाघाचा शोध सुरू आहे. वाघाच्या हल्ल्याची आठवडाभरातील ही दुसरी घटना असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नारसिंह गटल्या चव्हाण (६५) रा. शिवाझिरी असे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नारसिंह हे शुक्रवारी सकाळी आपल्या शेतात काम करीत होते. वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. नारसिंह यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यावर वाघाने तेथून धूम ठोकली. आवाज ऐकून शिवारातील शेतकऱ्यांनी तेथे धाव घेतली. त्यांनी तातडीने घटनेची माहिती वन विभाग व पोलिसांना दिली.

हेही वाचा >>> भंडारा : बनावट इन्स्टाग्राम खात्यावरून तरुणीला पाच लाखांचा गंडा

माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमी नारसिंह यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. वाघाचा शोध सुरू करण्यात आला आहे. ५ सप्टेंबर रोजी दादरा शिवारात गीता शुकलाल धांडे (१७) हिच्यावरही वाघाने हल्ला चढविला होता. या वाघाला जेरबंद करण्यासाठी या परिसरात ट्रॅम कॅमेरे व पिंजरे लावण्यात आले होते. परंतु, वाघाचा शोध लागला नाही.